'नांमका'सह नारंगी प्रकल्प प्रतिक्षेत
नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध धरणांतून गोदापात्रात विसर्ग सुरू होता. गेल्या काही दिवसांत जवळपास आठ धरणांमधून पैठणच्या जायकवाडी जलाशयात आतापर्यंत १० टीएमसी पाणी झेपावले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या गोदावरीच्या पाण्यामुळे जायकवाडी वाढ झाली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्यातील तहान भागण्यासाठी मोठी मदत होणार आहे. दरम्यान गोदापात्रातून कोट्यवधी लिटर पाणी जायकवाडीत झेपावले.परंतु वैजापूरचा नारंगी मध्यम प्रकल्पासह नांदूर मधमेश्वर कालवा अजूनही प्रतिक्षेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून गोदापात्रात पाणी सोडले. हेच पाणी नारंगी मध्यम प्रकल्पात सोडले असते तर वैजापूकरांची तहान भागली असती.
नाशिक जिल्ह्यातील धरणांतून ओव्हरफ्लोचा विसर्ग सोडल्याने गोदावरी नदी खळाळून वाहत आहे. |
यंदाच्या हंगामात मुबलक पाऊस नसल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणे तळ गाठण्याच्या मार्गावर होती. मात्र दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील जलसाठ्यात अचानक कमालीची वाढ झाली. या जिल्ह्यातील धरणांमध्ये सुमारे ३७ हजार ५८५ दशलक्ष घनफूट म्हणजेच ५७ टक्के जलसाठा झाला झाला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे आठ धरणांमधून गोदापात्रात विसर्ग सुरु होता. या विसर्गाच्या माध्यमातून जायकवाडी जलाशयात आतापर्यंत १० टीएमसी पाणी पोहोचले आहे.
जिल्ह्यात रविवारीही मुसळधार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील गंगापूरसह, दारणा व पालखेड धरणातील पाणी नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमध्ये सोडून नंतर ते गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आले. गेल्या २४ तासांत जायकवाडीला चार हजार तीन दशलक्ष घनफूट म्हणजे चार टीएमसीचा विसर्ग झाला आहे.एक जून ते रविवारी सकाळपर्यंत जायकवाडीला सहा हजार ४६४ दशलक्ष घनफूट म्हणजे ६.०४ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता. सोमवारपर्यंत १० हजार ४६४ दशक्ष घनफूट म्हणजे साडेदहा टीएमसी पाणी पोहोचले. याच दिवसापर्यंत नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून ५४ हजार २३३ क्युसेकने विसर्ग सुरू होता. असे सूत्रांनी सांगितले.
नेत्यांनी सरसावण्याची गरज
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पासह नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे पाणी सोडण्यावरून मोठा आगडोंब उसळला होता. परंतु आता नाशिक जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो होऊन ते पाणी गोदापात्रात सोडण्यात येत आहे. अशा परिस्थितीत मात्र वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी कुणीही करीत नाही. याशिवाय शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात सध्या मृतसाठा आहे. पालखेड धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरीऐवजी पालखेड डाव्या कालव्यातून नारंगी मध्यम प्रकल्पात सोडले असते तर वैजापूकरांची तहान भागली असती. नांमकातर्गंत ११५ पाणीवापर संस्था आहेत. यापैकी फक्त तीन संस्थांनी पाण्याची मागणी केली. वैजापूर तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून सोडलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्याचा फायदा घेण्यासाठी नेत्यांनी पुढे सरसावण्याची गरज आहे.
नाशकातील प्रमुख धरणातील उपलब्ध जलसाठा
गंगापूर – ८५.८६ टक्के, कश्यपी – ५१.०३ टक्के, गौतमी गोदावरी ८७.२६टक्के, आळंदी ७४.६३ टक्के, पालखेड – ६३.८६ टक्के, करंजवण – ५५.९३ टक्के, दारणा – ८४.२६ टक्के, भावली - १०० टक्के, मुकणे - ५२.८४ टक्के, वालदेवी - १०० टक्के, कडवा ८१.५८ टक्के
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक जलसाठा होऊन ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरीतून सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालखेडचे पाणी डाव्या कालव्यातून शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात सोडण्याची मागणी नाशिक पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
- डाॅ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष, वैजापूर