काळ्या यादीत टाकण्याचा इशारा
वैजापूर नगरपालिकेतर्गंत रस्त्यांसह नाल्यांची कामे मुदतीत न करणाऱ्या पाच ठेकेदारांना पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान शहरातील विविध विकासकामे मुदतीत पूर्ण न झाल्यास हा निधी परत जाण्याची भीती व्यक्त करून तसे झाल्यास ही सर्वस्वी जबाबदारी ठेकेदारांची राहील. तसेच ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकण्यात येतील. असेही या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर नगरपालिकेतर्गंत शहरातील रस्त्यांसह गटारींच्या कामांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. जवळपास १४ कोटी ५० लक्ष रुपयांची ही कामे असून या कामांचे कार्यरंभ आदेश देण्यात येऊन देखील ठेकेदारांनी ही कामे सुरू केलेली नाही. या कामाची मुदत देखील संपली आहे. शासन स्तरावरून हा निधी परत करण्यासाठी पालिका प्रशासनाला कळविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने संबंधित ठेकेदारांना लेखी व तोंडी कळवून देखील ही कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.
अखेर २९ जुलै रोजी पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी ठेकेदारांना नोटीस बजावली असून त्यात म्हटले आहे की, कार्यारंभ आदेश देऊन देखील आपण कामे सुरू केलेली नाही. कार्यारंभ आदेशातील नियम व अटीनुसार आपण मुदतीत काम पूर्ण केलेले नाही. यापूर्वी आपणास दूरध्वनीद्वारे तोंडी सूचना देण्यात आले आहे. कामाची मुदत संपल्यानंतर देखील आपण कामास मुदतवाढ मागितलेली नाही. सदरील कामे मुदतीत पूर्ण व निधी मुदतीत खर्च न झाल्यामुळे शासननिधी परत करण्याबाबत शासनस्तरावरून कळविण्यात आले आहे. आपणास देण्यात आलेली विकासकामे मुदतीत पूर्ण करण्यात यावी. तसेच कामांसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा चाचणी अहवाल देण्यात आलेला नाही. असे निर्देशनास आले आहे.
सदरील कामांसाठी प्राप्त झालेला निधी शासनाने परत घेतल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील तसेच होणाऱ्या नुकसानीस आपणास जबाबदार धरण्यात येऊन आपण भरलेला बयाना व देयकातून कपात करण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करण्यात येऊन आपला परवाना काळ्या यादीत टाकण्यात येईल. याची नोंद घेण्यात यावी. असे या नोटीसीत म्हटले आहे. दरम्यान पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी संबधित ठेकेदारांना नोटीस बजावून विहित मुदतीत काम करण्याचा सूचना दिल्या खऱ्या. परंतु ठेकेदार या आदेशाची कितपत अंमलबजावणी करतात? हे मात्र येत्या काही दिवसांत समजणार आहे. संबधित ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पालिकेतर्गंत रस्त्यांसह नाल्यांच्या कामांचे संबधित ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. परंतु मुदतीत काम सुरू न केल्याने निधी परत करण्याबाबत शासनाने कळविले आहे. त्यामुळे कामे सुरू करण्याबाबत वारंवार कळवूनही संबधित ठेकेदारांनी कामे सुरू केली नाही. अशा एकूण पाच ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
-भागवत बिघोत, मुख्याधिकारी, वैजापूर