Hospital | कामगाराने वेतन मागितले अन् अधीक्षकांनी बदडले.! 'या' रुग्णालयात 'राडा'

0

वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल 



वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या समितीकडून चौकशी सुरू असतानाच २९ जूलै रोजी रात्रीच्या सुमारास रुग्णालयात 'राडा' झाला. वेतन मागण्यासाठी गेलेल्या सफाई कामगारास कार्यालयीन अधीक्षकांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना २९ जूलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचे वाभाडे निघालेले असतानाच हा प्रकार घडल्याने रुग्णालय आणखी चर्चेत आले आहे. 


वैजापूर उपजिल्हा रुग्णालय. 


सागरे (कार्यालयीन अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील उपजिल्हा रुग्णालयात गौरव राजू त्रिभुवन हा सफाई कामगार म्हणून काम करतो. मार्च २०२४ पासून त्याला वेतन न मिळाल्याने तो कार्यालयीन अधीक्षक सागरे यांच्याकडे थकीत वेतनबाबत विचारणा करण्यासाठी गेला असता त्यांनी त्याला 'तुझा पगार नाही करीत जा, तुला काय करायचे ते कर' असे म्हणत अधीक्षकांनी त्रिभुवन याला शिविगाळ करून मारहाण केली.


 घटनेनंतर गौरव त्रिभुवन याने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अधीक्षक सागरे यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात राडा झाला खरा. परंतु रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकाराबाबत 'हाताची घडी तोंडावर बोट' ठेवून आहेत. कुणीच याबाबत 'ब्र' शब्द काढायला तयार नाही. काही अधिकाऱ्यांनी तर 'असे' काही झालेच नसल्याचा इन्कार केला आहे. परंतु असे असले तरी दुसरीकडे वैजापूर पोलिस ठाण्यातील मारहाणीच्या नोंदीने मात्र उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराचा बुरखा फाडला आहे. 


हम करे सो कायदा 

रुग्णालयातील कारभार दिवसेंदिवस ढेपाळत चालला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमधील गटबाजीचा परिणाम कामकाजावर होत आहे. बहुतांश अधिकारी व कर्मचारी जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये - जा करतात. आरोग्यसेवा अत्यावश्यक सेवेत मोडत असतानाही बहुतांश वेळी डाॅक्टर हजर राहत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डाॅक्टरांची मनमानी वाढून 'हम करे सो कायदा' झाला आहे. यामुळे आमदार रमेश बोरनारे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करून 'पोस्टमाॅर्टेम' केले होते. रुग्णालयाच्या कारभाराची विभागीय चौकशी सुरू असतानाच रुग्णालयात या निमित्ताने नवीन 'बखेडा' उभा राहिला. 


चौकशी समिती गेली अन् धिंगाणा झाला 

दरम्यान शहरातील उपजिल्हा रुग्णालयात तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला अतिदक्षता विभाग पुन्हा सुरू करून रुग्णाची हेळसांड थांबवावी यासह व अन्य विविध समस्यांबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात बैठक पार पडली होती. आमदार रमेश बोरनारे यांनी या बैठकीत रुग्णालयाच्या कारभाराचे 'पोस्टमाॅर्टेम' केल्यानंतर दखल घेत उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या 'कारभाराची' चौकशी करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर आरोग समितीने उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन सबंधितांकडून खुलासा मागितला आहे. याच पार्श्वभूमीवर २९ जूलै रोजी सकाळी लातूर येथील आरोग्य उपसंचालक डॉ. अर्चना भोसले यांच्यासह आठ सदस्यीय समितीने उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन चौकशी केली. ही समिती जवळपास दिवसभर उपजिल्हा रुग्णालयामध्ये तळ ठोकून होती. दिवसभर समितीने 'पोस्टमाॅर्टेम' करून मार्गस्थ झाल्यानंतर याच दिवशी रात्रीच्या सुमारास कार्यालयीन अधीक्षक व सफाई कामगारात हा 'राडा' झाला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top