वैजापूर येथील घटना
वैजापूर शहरातील ( Vaijapur City) चोऱ्यांचे सत्र थांबायला तयार नसून चोरट्यांचा पोलिसांच्या (police) नाकावर टिच्चून 'धमाका' सुरूच आहे. शहरातील स्टेशन रस्त्यावरील मर्चंट बँक कॉलनीत शुक्रवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. या घटनेत चोरट्यांनी घराच्या मागील खिडकीचे ग्रील कापून रोख पन्नास हजार, चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, दोन हजार रुपये किंमतीचे चांदीचे दोन ग्लास व एक वाटी असा ९२ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. तसेच अन्य दोन ते तीन घरात चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती तेथील रहिवाशांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून वैजापूर शहर व परिसरात चोरीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. अशी मागणी होत आहे.
चोरट्यांनी मर्चंट काॅलनीतील याच घरातून ऐवज लंपास केला. |
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जाणाऱ्या नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मर्चंट बँक कॉलनीत राहणारे डॉ. राजेंद्र पारळकर हे पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. घरात त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते. शुक्रवारी रात्री सर्व सदस्य झोपलेले असतांना चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने चोरून पोबारा केला. सकाळी उठल्यानंतर पारळकर कुटुंबीयांना चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी सौरभ पारळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार योगेश झाल्टे करीत आहेत.
पोलिसांची 'तत्परता'
दरम्यान शहरातील याच रस्त्यावर असलेल्या म्हसोबा चौकातील भारतीय स्टेट बँकेतून भरदिवसा दीड लाख रुपये लांबविल्याची घटना ताजी असताना दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून मर्चंट काॅलनीतील घर फोडून पुन्हा पुन्हा जोरदार आव्हान दिले आहे. सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जून व जूलै महिन्यात झालेल्या चोरीच्या घटना पाहता वैजापूर शहर चोरट्यांसाठी लूट व चोरीचा अड्डा बनला की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. घटना घडल्यानंतरही पोलिसांकडून पाहिजे ती तत्परता दाखविली जात नाही. पोलिस ठाण्यातील लँडलाईन फोन रिसीव्ह करण्याची कुणी तसदी घेत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चोरट्यांचा एकापाठोपाठ धमाका सुरूच असून या घटनांना लगाम केव्हा बसेल? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.