हडसपिपंळगावातील थरार
वैजापूर तालुक्यातील हडसपिंपळगाव (Hadaspimplgaon ) येथील ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेने पोलिस पाटलांंसह ग्रामस्थांनी तिघा दरोडेखोरांना ((Robber) जेरबंद करून पोलिसांच्या हवाली केले . १८ जूलै रोजी तालुक्यातील हडसपिंंपळगाव येथे पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दरम्यान संशयितरित्या फिरताना नजरेस पडलेल्या अन्य एका चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या धामधुमीत दोन चोरटे मात्र फरारी होण्यात यशस्वी ठरले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात (Vaijapur Police station) सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. परंतु ग्रामस्थांच्या सतर्कतेने त्यांचा डाव फसला अन् थेट तुरुंगात गेले.
वैजापूर तालुक्यातील हडसपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी दरोडेखोरांच्या टोळीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. |
शेख अमीर शेख नब्बू (रा. सईद कॉलनी छत्रपती संभाजीनगर), उमर रिझोद्दीन सय्यद (रशीदपुरा, टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर), अमजद खान सलीम खान (रा.बुढीलाईन, हिलाल कॉलनी,छत्रपती संभाजीनगर), इमरान खान युनूस खान (रा. शरीफ कॉलनी, छत्रपती संभाजीनगर), अरबाज शेख (रा.रहेमानिया कॉलनी) व रियान शेख (रा.मिसारवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी पहाटे वैजापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार संदीप पवार व पोलिस शिपाई कुऱ्हाडे हे दोघे वैजापूर तालुक्यातील हडसपिंंपळगाव येथे पहाटे अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर होते.
यावेळी त्यांची नजर एका ठिकाणी उभे असलेल्या तिघांवर पडली. परंतु पोलिस आल्याचे समजताच यातील दोघांनी तिथून पळ काढला तर एकजण हवालदार संदीप पवार यांच्या हाती लागला. त्यांनी त्या इसमाला त्याचे नाव गाव विचारले असता तो त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यावेळी कर्मचारी पवार यांनी हडसपिंंपळगावचे पोलिस पाटील कारभारी निघोटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. तिथे पोहचताच हा इसम गावातील नसल्याचे त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला सांगितले. याशिवाय त्याच्यासोबत असलेले इसम का पळाले ? असा प्रश्न देखील सर्वांना पडला.
दरम्यान शेजारी एका दुकानाजवळ शटर तोडण्यासाठी गज व दगड असल्याचे पोलिस पाटील निघोटे व पोलिस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. या सर्व प्रकारामुळे आपण पकडलेला इसम हा चोर असल्याची त्यांची खात्री पटली. यावेळी त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गावात फोन करून घडलेल्या परिस्थितीशी अवगत केले. यानंतर पोलिसांचे वाहन गावातून निघून गेले. दरम्यान ग्रामसुरक्षा यंत्रणेचा काॅल गेल्याने गावातील तरुण व ग्रामसुरक्षा दलाचे सर्वजण मदतीसाठी हजर झाले. त्यानंतर प्रत्येकी एका तासाला असे तीन तासात तिघा संशयित चोरट्यांना गावकऱ्यांनी ताब्यात घेतले. या सर्वांची नावाची चौकशी केली. यापैकी अरबाज व रियाज हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.
गावात फोडली टपरी
पोलिस कर्मचाऱ्याच्या हाती एक चोरटा हाती लागल्यानंतर पोलिस पाटील व ग्राम सुरक्षारक्षक दलाच्या सदस्यांनी अन्य तीन संशयित चोरटे पकडले. तत्पुर्वी या चोरट्यांनी गावातील एक टपरी फोडून त्यातील साहित्य व एक मोटरसायकल चोरी केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी पकडलेल्या तिघांना पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांनी चोरट्यांकडून तीन मोटारसायकल, हातोडा, खिळे उचकविण्यासाठी लागणारे साहित्य, गांजा ओढण्यासाठी लागणारी चिलीम जप्त केले आहे. दरम्यान कारभारी निघोटे, विष्णू निघोटे, इंदर निघोटे, राहुल निघोटे, शिवाजी निघोटे, गणेश डगळे आदींनी शिताफीने चोरटे पकडले.