वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
पीएम किसन योजनेच्या नावाने आलेले फेक अॅप मोबाईलमध्ये इंस्टॉल केल्याने सायबर भामट्यांंनी एकाला दीड लाख रुपयाला गंडविल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्यांंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर डिके (३४) हे कृषी केंद्रचालक असून वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील रहिवासी आहेत. त्यांचे गावातच सदगुरू कृपा कृषी सेवा केंद्र नावाने दुकान आहे. २७ जून रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईल फोनमध्ये पीएम किसान योजना नावाने एपीके फाईल आली. ज्ञानेश्वर यांनी सदरील अँॅप मोबाईल फोनमध्ये अलाऊ करून इंस्टॉल करून घेतले. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ जून रोजी सकाळी ते झोपेतून उठले व त्यांनी आपला मोबाईल फोन बघितला. त्यांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक (परसोडा) खात्यातून २० हजार रुपये काढलेबाबत एकूण ५ संदेश त्यांना आले.
याशिवाय आणखीन ५० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचे एकूण १ लाख ५० हजार (दीड लाख रुपये) त्यांच्या बँक खात्यातून कपात झाल्याचे त्यांना समजले. दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर त्यांनी छञपती संभाजीनगर येथील सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी इंस्टॉल केलेल्या फेक मोबाईल अँँपद्वारे सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलचा अक्सेस घेऊन त्यांच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये उडविल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. यानंतर बुधवारी त्यांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांंत सायबर भामट्यांंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया स्त्रोत - गुगल