अधिकाऱ्यांची उडाली धांदल
विशेष पोलिस महानिरीक्षकांनी गुरुवारी वैजापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पोलिस ठाण्यात अचानक भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. दरम्यान महानिरीक्षकांनी दिलेल्या सरप्राईज व्हिजिटमुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली.
विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. |
छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी गुरुवारी अचानक वैजापूर येथे भेट दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह वैजापूर, शिऊर व वीरगाव पोलिस ठाण्यास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. याबाबत त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता ते म्हणाले की, आज अचानक पोलिस ठाण्यांना भेट देण्याचे ठरले. हा दौरा नियोजित नसल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील तिन्हीही पोलिस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला असल्याचे ते म्हणाले.
वैजापूर शहरासह शिऊर व वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढणारी गुन्हेगारी , चोऱ्यांचे सत्र पाहता हा गंभीर विषय आहे. याशिवाय मनुष्यबळ अपुरे आहेत. तसेच वैजापूर पोलिस ठाणेप्रमुखांच्या वाढत्या तक्रारीबरोबरच चोऱ्यांच्या घटनांत झालेली वाढ तसेच अन्य विविध विषयांबाबत पोलिस अधीक्षकांना सूचना देणार असल्याचेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. यावेळी प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.