पीडित महिलेची सुटका
वैजापूर शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात लाॅजच्या नावाखाली अनेक दिवसांपासून खुलेआमपणे चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा अड्डा पोलिसांनी ०१ जुलै रोजी उध्वस्त केला आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी एका पीडितेची सुटका करून दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजापूर शहरातील जुन्या बसस्थानकातील याच राधिका लाॅजवर वेश्याव्यवसाय सुरू होता. |
सचिन लक्ष्मण खंडागळे व आकाश चंद्रकांत वाघ (दोघे रा. इंदिरानगर, वैजापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुन्या बसस्थानकात नागरी वसाहतीत असलेल्या राधिका लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली. त्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या पथकाने ०१ जुलै रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास लॉजवर ( पहिला मजला ) छापा टाकला असता तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
यावेळी पोलिसांनी पीडित महिलेसह सचिन खंडागळे व आकाश वाघ या दोघांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान पोलिसांनी निरोध पाकिटे, मोबाईल संच व रोख रक्कम असा एकूण ३५ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून एका पीडितेची सुटका केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्यादे गये जेल में, वजीर बच गया खेल में !
जुना बसस्थानक परिसरात असलेल्या राधिका लॉजवर मागील बऱ्याच दिवसापासून वेश्याव्यवसायाचा अड्डा सुरू होता. शहरातील भरवसाहतीत सुरू असलेल्या या अड्ड्यावर एवढे दिवस पोलिसांची नजर कशी पडली नाही ? हा मोठा यक्षप्रश्न आहे. दरम्यान लॉजवर देहविक्रीचा व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन सुरू होते. परंतु कारवाई दरम्यान लॉज मालकावर पोलिसांनी मेहरनजर केल्याने 'प्यादे गये जेल में, वजीर बच गया खेल में' अशी चर्चा शहरात ऐकावयास मिळत आहे.
बहुतांश लाॅजमध्ये देहविक्रय
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एका लाॅजवर छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. या ठिकाणीही गेल्या अनेक दिवसांपासून देहविक्रय सुरू होता. शहरासह परिसरातील बहुतांश लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय खुलेआमपणे सुरू आहे. लाॅजच्या नावाखाली देहविक्रय करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. यामुळे शहरातील वातावरण दिवसेंदिवस कलुषित होत चालले आहे.