शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा
बहुचर्चित रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या शासनाने केलेल्या तब्बल ६५ कोटी ( मुद्दल) रुपयांच्या कर्जमाफीनंतर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही १४५ कोटी रुपये व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जूलै रोजी झालेल्या बँकेच्या सर्वसाधारण मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान योजनेपोटी तालुक्यातील १४ गावांतील २ हजार ११७ शेतकऱ्यांच्या डोक्यावर २१० कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर होता. या निर्णयानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जमाफीचा निर्णय सभेत झाल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमदार रमेश बोरनारे यांचा सत्कार केला. याप्रसंगी संचालक डॉ. दिनेश परदेशी, अप्पासाहेब पाटील आदी. |
काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या पुढाकारातून तालुक्यातील १४ गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी १९९१-९२ साली श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित केली होती. वास्तविक पाहता या योजनेची मुहुर्तमेढ सन १९८८ सालीच रोवली गेली होती. तालुक्यातील महालगाव, भगूर, पानवी, टेंभी, सिरसगाव, बल्लाळीसागज, एकोडीसागज, खिर्डी, माळीसागज, कनकसागज, टाकळीसागज, गोळवाडी, पालखेड, दहेगाव या १४ गावातील २११७ शेतकरी सभासदांच्या शेतजमिनींना सिंचनाचा फायदा होण्याच्या हेतूने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा करण्याचे ठरले होते.
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी उपस्थित संचालक. |
योजना कार्यान्वित होऊन सात - आठ वर्षे चालू राहिली. सन १९९५ मध्ये पैठण येथील जायकवाडी धरणासाठी पाणीसाठा आरक्षित करण्याचा निर्णय शासनाच्या पाटबंधारे विभागाने घेतला. याचबरोबर ढिसाळ नियोजन व भ्रष्टाचाराच्या वाळवीने अखेर ही योजना बंद पडून गुंडाळली गेली. सुरवातीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंकडून लाभधारक शेतकऱ्यांच्या सातबारावर ३४ कोटी रुपये कर्ज घेवून योजना सुरू करण्यात आली होती. दरम्यान १८ जून २०२४ रोजी राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या कार्यासन अधिकारी राहुल शिंदे यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या आदेशानुसार, तालुक्यातील श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्या. (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर ) योजनेचे थकीत कर्ज (मुद्दल) रु. ६४२६.५९ लाख रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु योजनेच्या मुळ कर्जावर झालेल्या व्याज पाहता चहापेक्षा किटली गरम असे म्हणण्याची वेळ आली होती. शासनाने मुद्दल रकमेची म्हणजेच ६४ कोटी २६ लाख ५९ हजार रुपये कर्जमाफी केली खरी. परंतु उर्वरित रक्कम भरल्याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नव्हती. व्याजासह २१० कोटींच्या जवळपास कर्ज असलेल्या रकमेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होती. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत १६ जूलै रोजी बँकेने योजनेच्या १४५ कोटी २७ लाख १० हजार रुपये व्याज माफ करून कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी सभेत कर्जमाफी देण्याचा ठराव मांडला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी यांनी अनुमोदन दिले आणि सर्व सभासदांनी ठरावास संमती दिली. या निर्णयामुळे तालुक्यातील २ हजार ११७ शेतकऱ्यांना दिलासा मिळून त्यांचा सातबारा कोरा होणार आहे.
दोन शिलेदारांचा पाठपुरावा
दरम्यान या योजनेच्या कर्जमाफीसाठी शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी सुरवातीपासू सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. काँग्रेससह दरम्यानच्या काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातही कर्जमाफीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला होता. परंतु यश आले नाही. विशेषतः महायुतीचे सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय दिला. बँकेने कर्जमाफीची घोषणा करताच वैजापूर येथे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तथा खासदार संदीपान भुमरे व सर्व संचालक मंडळाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करतो.
- प्रा. रमेश बोरनारे, आमदार, वैजापूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभेत रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेच्या १४५ कोटी २७ लाख १० हजार रुपयांच्या रकमेची कर्जमाफी केली. आमदार रमेश बोरनारे यांनी ठराव मांडला. मी अनुमोदन दिले व अन्य संचालकांनी संमती दिली. महायुती सरकारने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला.
- डॉ. दिनेश परदेशी, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक, वैजापूर