सामग्री खरेदी प्रकरण
वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात यंत्र सांमग्रीत खरेदीत आफरातफर झाल्यासह अन्य सहा मुद्दयांची पोलखोल आमदार रमेश बोरनारे यांनी आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या एका बैठकीत केली होती.. याची दखल घेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर सहसंचालक सुनीता गोल्हाईत यांनी सदरील प्रकरणात चौकशी करून चौकशी अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायास आयुक्तालयास सादर करण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांसह अन्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वैजापूर उपजिल्हा रुग्णालय. |
याबाबत अधिक माहिती अशी की , शहरातील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्यासंदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हेही या बैठकीस उपस्थित होते. वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागासाठी तीन कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतु हा विभाग गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्यामुळे तालुक्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीत मोठ्या प्रमाणावर अफरातफर करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णालयातील गलथान कारभाराची देखील आ.बोरनारे यांनी पोलखोल केली.
रुग्णालयातील कंत्राटी वर्ग ४ चे कर्मचारी, नर्सिंग स्टाफ व सुरक्षारक्षकांचे गेल्या ८ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. रुग्णालयातील स्वच्छता व धुलाईसाठी वीस लाख रुपयांची मंजुरी असताना मागील ८ महिन्यांपासून जिल्हा शल्यचिकित्सकांकडून उपजिल्हा रुग्णालयास निधीच आलेला नाही. या ठिकाणी असलेल्या सर्वच रुग्णवाहिका इंधनाअभावी बंद आहेत. सी.टी. स्कॅन यंत्रही बंद पडले आहे. रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी २४ लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतु सदरील यंत्रणा परिपूर्ण अवस्थेत नसतनाही संबंधितानी पूर्ण देयके काढून घेतली. त्यामुळे येथील अग्निशमन यंत्रणा बंद अवस्थेत आहे. रुग्णालयात शासनामार्फत होणाऱ्या कामांसाठी रुग्णालयाची ना रकत न घेता निधी वितरीत केला जात असल्याची तक्रारही बोरनारेंना या बैठकीत केली.
दरम्यान या बैठकीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक प्रत्यक्षात हजर नव्हते. परंतु नंतर त्यांनी आॅनलाईन बैठक अटेंड केली. मात्र त्यांचे प्रतिनिधी या बैठकीसाठी हजर होते. आमदार बोरनारेंच्या तक्रारीनंतर आरोग्यमंत्र्यांनी संबधित सर्वच अधिकाऱ्यांना फैलावर घेत जाब विचारला. उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभारात सुधारणा करा. अशी सक्त ताकीद देऊन जिल्हा शल्य चिकित्सकांच्या गलथान कारभारासह अतिदक्षता विभागासाठी खरेदी करण्यात आलेल्या गैरव्यवहाराची चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश आरोग्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिले.
दरम्यान या पार्श्वभूमीवर सहसंचालक सुनीता गोल्हाईत यांनी सदरील प्रकरणी आमदार रमेश बोरनारे यांच्या २७ जून २०२४ च्या पत्राचा संदर्भ देऊन उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग साहित्य खरेदी दरम्यान झालेल्या गैरव्यवहारासह इतर मुद्यांची चौकशी अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायास आयुक्तालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.