पोलिस 'नेहमीप्रमाणे' पोहोचले उशिराने
नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव भागातील एका एटीएम मशीनवर दरोडा टाकून सोबत मशीन घेऊन फरार होण्याच्या मार्गावर असलेल्या दोघा चोरट्यांना वैजापूर तालुक्यातील तलवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी जीव धोक्यात घालून पाठलाग करीत शिताफीने पकडले. ११ जुलै रोजी भल्या सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी पकडून शिऊर पोलिसांच्या हवाली केले. रफूचक्कर होण्याच्या प्रयत्नात एक चोरटा विहिरीत पडला असता ग्रामस्थांनी त्याला दोरखंडाच्या साह्याने बाहेर काढले. दरम्यान नेहमीच्या 'सवयीनुसार' शिऊर पोलिसांनी तब्बल दीड तासानंतर पोहोचून 'तत्परता' दाखविली.
एटीएम मशीन फोडून पळणारे शेतकऱ्यांनी पकडलेले हेच ते दोन भामटे. सोबत शिऊर पोलिस. |
वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे शेतकऱ्यांनी मोठ्या शिताफीने एटीएम चोरट्यांना पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले. गुरुवारी सकाळी म्हणजेच ११ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा थरार घडला. सकाळी लघुशंकेसाठी हे चोरटे रस्त्यालगत थांबले होते. दरम्यान त्यांच्या हालचालीवरून काही शेतकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी अन्य शेतकऱ्यांना ही बाब कळवून या वाहनाचा पाठलाग केला.
शेतकऱ्यांनी भामट्यांना बांधून ठेवले होते. |
दरम्यान पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच पळून जाण्याचा बेतात असलेल्या दोघांना नागरिकांनी शिताफीने पकडून बांधून ठेवले. यातील विष्णू आकात भामटा पळताना विहिरीत पडल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याला दोरखंडाच्या साह्याने बाहेर काढले. या धामधुमीत त्यांचा एक साथीदार फरार झाला. चोरट्यांच्या स्कॉर्पिओमध्ये एटीएम आढळून आल्याने गावकऱ्यांनी चोरट्यांना बांधून ठेवत शिऊर पोलिसांना संपर्क केला.
चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेल्या चाकूसह एटीएम कार्ड व मोबाईल. |
गस्तीवर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांच्या ताब्यातून एटीएमसह स्कॉर्पिओ वाहन व चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनात असलेले एटीएम मशीन हे सटाणा रोड - मालेगाव पासून १०-२० किमी अंतरावरून चोरी केले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गावकऱ्यांनी पकडून बांधून ठेवलेल्या दोघांना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून विष्णू रामभाऊ आकात (वय २९ वर्षे रा. सातवण ता. परतूर जि. जालना) व देवा सुभाष तावडे (वय २० रा. पुंडलिकनगर, छञपती संभाजीनगर ) अशी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत तर संशयितांचा अन्य एक साथीदार आकाश घाडगे हा फरार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
स्काॅर्पिओ कारमध्ये आणलेले एटीएम मशीन. |
ठाणेप्रमुखांची 'तत्परता'
ठाणेप्रमुखांना घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल दीड तास लागला. त्यानंतर दोघा चोरट्यांसह त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत करून ठाणेप्रमुखांनी घटनास्थळासह शिऊर पोलिस ठाण्यात फोटोसेशन करून 'चमकोगिरी' करण्याचा प्रयत्न केला. एटीम चोरट्यांना शेतकऱ्यांनी पकडले. परंतु फोटोसेशन ठाणेप्रमुखांनी करून घेतले. हे विशेष!