प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत
'तू अंघोळ करून नाही आलास' यासह शिधापत्रिकाधारकाचा ई - पॉस यंत्रावर अंगठा उमटत नसल्याने झालेल्या वादातून ग्राहकाला मारहाण झाल्याची घटना वैजापूर शहरातील एका स्वस्तधान्य दुकानावर घडली. दरम्यान घटनेनंतर मोठा जमाव वैजापूर पोलिस ठाण्यात जाऊन धडकला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर शहरातील सर्वच स्वस्तधान्य दुकानांवर सध्या ई- केवायसी करण्याचे काम सुरू आहेत. यासाठी कुटुंबप्रमुखासह घरातील सर्व सदस्यांचे अंगठ्याचे ठसे घेण्याचे काम सुरू आहे. यासाठी सोमवारी सकाळी एक ग्राहक रेशन दुकानावर गेला. त्या ठिकाणी त्याने ई - पॉस यंत्रावर अंगठा दिला. परंतु रेशन दुकानदराने तुमचा थम्ब लागत नाही. पुन्हा अंगठा ठेवा असे दुकानदाराला सांगितले. जेंव्हा तीन-चार वेळा प्रयत्न करून देखील ग्राहकाचा अंगठा लागला नाही. तेंव्हा मात्र संतप्त झालेल्या रेशन दुकानदाराने 'तुम नहा के नही आये क्या ?' असा सवाल ग्राहकाला केला. रेशन दुकानदाराच्या या संवाद फेकीमुळे ग्राहक व रेशन दुकानदारामध्ये हमरीतुमरी सुरू झाली.
सुरू असलेल्या प्रकरामुळे रेशन दुकानदाराची मुले त्या ठिकाणी आली. यावेळी त्या मुलांनी ग्राहकाला मारहाण करण्यास सुरवात केली. अखेर जमा झालेल्या नागरिकांनी हे भांडण सोडविले. यानंतर शिधापत्रिकाधारकाने रेशन दुकानंदराविरुद्ध तक्रार देण्यासाठी थेट पोलिस ठाणे गाठले. यावेळी पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण रफादफा झाले. रेशन दुकानांवर 'थंब' देताना अंगठा न उमटणे व त्यावरून दुकानदार व ग्राहकांमध्ये वाद होणे हा प्रकार कमी अधिक प्रमाणात शहरातील बहुतेक रेशन दुकानमध्ये सुरू आहे. दरम्यान ठाण्यात मोठा जमाव जमला होता. परंतु पोलिसांनी हे प्रकरण सामंजस्याने मिटवून सर्वांना घरी पाठविले. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
रेशन दुकानदारांची मनमानी
दरम्यान शहरासह तालुक्यातील बहुतेक दुकानदार हे मनात येईल तेंव्हा दुकान उघडणे, ग्राहकांशी उर्मट वागणे, वेळेआधीच रेशन दुकान बंद करून आज नाही उद्या या. असे सांगून शिधापत्रिकाधारकांना पिटाळून लावणे यासारखे प्रकार करत असतात. या सर्व प्रकाराकडे आता महसूल विभागाने वेळेआधीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे अन्यथा यावरून भविष्यात एखादी मोठी घटना होऊ शकते.
शिधापत्रिकाधारक व रेशन दुकानदाराचा वाद होऊन प्रकरण ठाण्यात आले होते. परंतु दोन्हीही बाजूच्या मंडळींना समजावून सांगितले. त्यामुळे सामंजस्याने हे प्रकरण मिटले.
- श्यामसुंदर कौठाळे, ठाणेप्रमुख, वैजापूर