पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा
सासरी नांदण्यासाठी आलेल्या पत्नीला तीन तलाक देणारा पती व घरातील अन्य सदस्यांनी तिला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद मोहिब अहमद सय्यद वजीर (पती), सय्यद जोहरा बेगम सय्यद वजीर (सासू), सय्यद वजीर सय्यद युसुफ (सासरा), सय्यद अतियाना फातेमा सय्यद वजीर (नणंद) सर्व रा.वैजापूर, सोफीयान शेख अब्दुल रऊफ, परवेज शेख अबाज, सरफराज सय्यद अशफाक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांंची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद मारीया तबसुम हिचा विवाह वैजापूर येथील सय्यद मोहिब अहमद याच्याशी पार पडला होता. लग्नानंतर काही दिवस बऱ्याचपैकी नांदविल्यानंतर पत्नी माहेराहून कार घेऊन ये. अशी मागणी करायला लागला. दरम्यान विवाहिता छत्रपती संभाजीनगर येथे तिच्या माहेरी असताना तिला समजले की मोहिब हा दुसरे लग्न करीत आहे.
त्यामुळे ती आपल्या आई, मामा व मावशीसह वैजापूर येथे सासरी आली. ती घरी येताच तिचा पती मोहिब हा तिला तीन वेळा तलाक, तलाक म्हणून तिला शिवीगाळ करू लागला तर 'मी अलिया सय्यद नजीर हिच्याशी लग्न केले आहे. तुला काय करायचे ते कर'. असे म्हटला. यादरम्यान सासरा वजीर याने देखील तिला अपशब्द बोलला तर सोफीयान शेख अब्दुल रऊफ, परवेज शेख अबाज, सरफराज सय्यद अशफाक यांनी तिचा विनयभंग केला व तिच्या मामाला देखील लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावयावरच केला होता चाकूहल्ला
दरम्यान या घटनेप्रकरणी सय्यद वजीर यांनी देखील सुनेच्या नातलगांनी आपल्याला व कुटुंबियांना मारहाण करून मुलगा मोहिब याच्यावर चाकूहल्ला केल्याची फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेसह तिच्या माहेरच्या मंळीविरुद्ध देखील वैजापूर पोलिस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.