आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कौटुंबिक वादातून सासुरवाडीच्या मंडळींनी जावयावर चाकू हल्ला करून त्याच्या आईवडिलांना जबर मारहाण केल्याची घटना वैजापूर शहरातील नाईकवाडी गल्ली परिसरात ०७ जुलै रोजी घडली.
याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात मारिया मोहिब सय्यद (पत्नी), रिजवानाबानू गयूर खान रा. छत्रपती संभाजीनगर (सासु), शबिना मुबारक शेख (मामे सासरा), खलील अहमद गफार शेख (मामे सासरा), जलील अहमद गफार शेख (मामे सासरा), जमिल अहमद गफार शेख (मेव्हणा ) व अन्य दोघे (नाव गाव माहित नाही) सर्व रा. मालेगाव जि. नाशिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद वजीर सय्यद युसूफ (नाईकवाडी गल्ली, वैजापूर) हे दस्तलेखन करून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले असून दोन्ही मुलांची लग्न झालेली आहेत. पैकी लहान मुलगा मोहिब वजीर याची पत्नी मारिया सय्यद हिने मागील काही दिवसांपासून पती मोहिब याला छत्रपती संभाजीनगर येथे राहण्यासाठी चला असा तगादा लावला. परंतु मोहिब हा तिला नकार देत होता. यामुळे या दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली.
मोहिबच्या सासू सासरे हे देखील छत्रपती संभाजीनगर येथे रहायला या. असे जावायाला सांगू लागले. पण त्यांना देखील त्याने नकार दिला. अखेर फेब्रुवारी महिन्यात मारिया ही माहेरी राहण्यास गेली. सून परत येत नसल्याने सय्यद वजीर यांनी मुलगा मोहिब याचे त्यांच्या भावाच्या मुलीशी दुसरे लग्न लावण्याचे ठरवले. ०६ जुलै रोजी मोहिब याचा दुस-या लग्राचा कार्यक्रम पार पडला व सर्व नातलग घरी परतले. दरम्यान शनिवारी मध्यरात्री कुणी तरी घराचा दरवाजा वाजवत असल्याचा आवाज वजीर यांच्या कानी पडला. यावेळी त्यांनी खिडकीतून बाहेर बघितले असता त्यांना पहिली सून व अन्य मंडळी घराबाहेर उभे असल्याचे दिसले.
यामुळे त्यांनी दरवाजा उघडला नाही. परंतु त्या मंडळींनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दरम्यान घरात घुसताच एकाने मोहिब याच्यावर चाकू हल्ला केला तर वजीर सय्यद, त्यांची पत्नी व मुलीला आलेल्या टोळक्याने जबर मारहाण केली. घटनेदरम्यान वजीर यांच्या खिशातून ६२ हजार रुपये पडले तर घराबाहेर असलेल्या त्यांच्या कारची देखील टोळक्याने तोडफोड केली. घराबाहेर परिसरातील लोक जमा होत असल्याचे लक्षात येताच मारहाण करणारे सर्वजण तिथून निघून गेले.
छाया स्त्रोत - गुगल