प्रशिक्षणासाठी सभागृह नाकारले
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेसाठी शासन अटी शिथिल करीत असतानाच या योजनेचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या ८० अंगणवाडी ताईंना प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे व्हरांड्यात बसून प्रशिक्षण घ्यावे लागले. अंगणवाडी ताईंनी प्रशिक्षणासाठी पंचायत समितीचे सभागृह देण्याची वारंवार विनंती केली.. परंतु बीडीओंनी अडेलतट्टूपणा सोडला नाही. सभागृह बंद ठेवले परंतु चावी देण्याचे औदार्य दाखविले नाही. त्यामुळे ताईंमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वैजापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी सभागृह नाकारल्यानंतर अंगणवाडी ताईंना व्हरांड्यात बसावे लागले. |
याबाबत अधिक माहिती अशी की, शासनाने राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना सुरू केली आहे. १ जूलैपासून ही योजना लागू होणार आहे. त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्येक घराघर आणआणि प्रशासकीय पातळीवर लगीनघाई सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी सेतू सुविधा केंद्रांसह विविध ठिकाणी महिलांची गर्दी केली आहे. या योजनेसाठी कुणी अडवणूक अथवा अडचणी निर्माण करीत असेल तर संबंधितांविरुद्ध थेट कारवाईचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. परंतु असे असले तरी या योजनेसाठी सरकारी 'बाबू'च खोडा घालत असल्याचे समोर आले आहे. या योजनेच्या पार्श्वभूमीवर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून तालुक्यातील ८० अंगणवाडी ताईंना प्रशिक्षणासाठी येथील पंचायत समिती कार्यालयात बोलाविण्यात आले होते. संबधित अधिकाऱ्यांसह अंगणवाडी ताईंनी या प्रशिक्षणासाठी पंचायत समिती कार्यालयातील विनायकराव पाटील सभागृह देण्याची विनंती केली.
परंतु प्रभारी गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांनी 'तुम्ही अगोदर मला लेखी द्यायला पाहिजे होते. अचानक मला सभागृह देता येणार नाही'. असे सांगून प्रशिक्षणासाठी सभागृह देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे अंगणवाडी ताईंचे म्हणणे आहे. वास्तविक पाहता पंचायत समिती सभागृहात राजकीय कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल होत असताना महिलांच्या कल्याणकारी योजनेच्या प्रशिक्षणासाठी सभागृह मिळत नसेल तर धन्य आहे ते अधिकारी अन् धन्य आहे यंत्रणा. अगोदरच तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी ताईंना बसण्यासाठी सभागृह उपलब्ध करून देत नसेल तर अधिकाऱ्यांचा इगो पराकोटीला पोहोचल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल.
एरवी सभागृह बंदच होते. तेथे कुठलाही कार्यक्रम नव्हता. त्यामुळे नियम, अधिकाराचा 'तोरा' बाजूला केवळ स्त्रीदाक्षिण्य म्हणून का होईना. सभागृह उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे हा शासकीय कार्यक्रम होता. कुणाचा खासगी अथवा वैयक्तिक नव्हता. गटविकास अधिकाऱ्यांच्या तोऱ्यामुळे अंगणवाडी ताईंना शेवटी व्हरांड्यात खाली बसून प्रशिक्षण घ्यावे लागले. प्रशिक्षण झाल्यानंतरही अंगणवाडी ताई गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने 'शिमगा' घालत होत्या. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी गटविकास अधिकाऱ्यांच्या या 'अडेलतट्टूपणा'वर काही बोलायला तयार नसले तरी त्यांनाही ही कृती पसंत पडलेली नाही. याबाबत अंगणवाडी ताई वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून तक्रार करणार असल्याचे समजते. दरम्यान प्रभारी गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी काॅल रिसीव्ह केला नाही.
बीडीओ हटावचा नारा
प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर नाराजी असून अमावस्या - पौर्णिमेला उगवणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला जनता वैतागली आहे. नेहमीच दुपारी चार वाजेनंतर कार्यालयात येणाऱ्या बीडीओंवर कुणाचे नियंत्रण नाही. त्यामुळे गेल्या आठवड्ययातच युवक काँग्रेसच्यावतीने पंचायत समितीच्या कार्यालयासमोर जागरण - गोंधळ आंदोलन करून कार्यालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला गेला. बीडीओंच्या हम करे सो कायद्यामुळे तालुक्यात बीडीओ हटावचा नारा सुरू झाला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिलांसाठी अभिनव व कल्याणकारी योजना आहे. अंगणवाडी ताईंच्या प्रशिक्षणासाठी पंचायत समितीचे सभागृह बीडीओ उपलब्ध करून देत नसेल तर हा गंभीर प्रकार आहे. नियम बाजूला ठेवून सभागृह उपलब्ध करून देणे गरजेचे होते. त्यांनी तोरा, इगो इथे आणायला नको. मी अधिवेशनात आहे. तेथे आल्यानंतर बीडीओंशी चर्चा करील.
- प्रा. रमेश बोरनारे, आमदार, वैजापूर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील ८० अंगणवाडी सेविका पंचायत समिती कार्यालयात आल्या होत्या. प्रशिक्षणासाठी बीडीओंना सभागृह देण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी मला याबाबत एक दिवस अगोदर लेखी द्यायला हवे होते. असे सांगून बीडीओंनी सभागृह देण्यास नकार दिला. वास्तविक पाहता सभागृह कुलूपबंद होते. सेविकांना उपलब्ध करून दिले असते तर कोणते आकाशपाताळ एक झाले असते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार देणार आहे.
- माया म्हस्के, अंगणवाडी सेविका, वैजापूर