पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवरच प्रश्नचिन्ह!
वैजापूर शहरातील भारतीय स्टेट बँकत (एसबीआय, म्हसोबा चौक) भरणा करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाची एक लाख ४२ हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ११ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेतील चोरटा हा अल्पवयीन असून तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान दहा दिवसांपूर्वी शहरातील एका बँकेतून देखील भरदिवसा ग्राहकाचे ३३ हजार रुपये अल्पवयीन चोरट्याने चोरल्याची घटना घडली होती. भरदिवसा सुरू असलेल्या चोरीच्या या घटनांंमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एसबीआय बँकेतून बॅग उचलून फरार झालेला हाच तो चोरटा. |
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय साहेबराव त्रिभुवन (रा.जयभवानीनगर, आघूर ) हे जीम ट्रेनर असून त्यांचा बॅग मॅन्युफॅक्चरींंगचा देखील व्यवसाय आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता त्यांनी शहरातील बंधन बँकेतील त्यांच्या खात्यातून एक लाख ४२ हजार रुपये काढले. नंतर ते स्टेशन रस्त्यालगत असलेल्या जीवनगंगा वसाहतीत असलेल्या त्यांच्या घरी (ह. मु.) परतले. त्यानंतर जेवण आटोपून बंधन बँकेतून काढलेले एक लाख ४२ हजार व घरातील २० हजार असे एकूण एक लाख ६२ हजारांची रोकड एका बॅगमध्ये सोबत घेऊन सव्वातीन वाजता ते म्हसोबा चौकातील एसबीआय बँक शाखेत गेल्यानंतर त्यांनी बॅगमधून २० हजार रुपये त्यांच्या बचत खात्यात भरणा करण्यासाठी काढले.
पैशांची बॅग घेऊन त्याने साथीदाराच्या मदतीने धूम ठोकली. |
दरम्यान या रकमेचा भरणा करत असताना बाजूला ठेवलेली बॅग (रक्कम असलेली) गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. रकमेची बॅग घेऊन तो मुलगा साथीदाराच्या मदतीने दुचाकीवरून फरार झाला. दरम्यान याप्रकरणी विजय त्रिभुवन यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात एक लाख ४२ हजार रुपये चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ०१ जुलै रोजी देखील शहरातील एका बॅंकेतून एका अल्पवयीन चोरट्याने बँकेत आलेल्या ग्राहकाचे ३३ हजार रुपये 'उडवले' होते तर आजच्या घटनेत देखील एका अल्पवयीन मुलाचाच सहभाग असल्याची चर्चा शहरात सुरू होती. हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत पोलिस निरीक्षकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काॅलला प्रतिसाद दिला नाही.
'चोरट्यांची दिवाळी, नागरिकांचे दिवाळे'
गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. ०१ जून रोजी म्हसोबा चौकातील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी ११ लाख ३९ हजार रुपये उडवले तर ०३ जुलै रोजी लाडगाव रस्त्यालगत एका पॅथलॉजी लॅबमधून चोरट्याने भरदिवसा २५ हजार रुपये, साखरे चौकातील सराफा दुकान फोडून लाखो रुपयांची चांदी, स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटी फोडून रोकड, २५ जून रोजी आघूर येथील एका बंद घरातून दोन लाखांचा ऐवज, २७ जून रोजी येवला रस्त्याहून ट्रक चालकाच्या खिशातील ३५ हजारांची रोकड, ०१ जुलै रोजी भरदिवसा मोंढा मार्केट परिसरातील एका बँकेतून चिमुकल्या चोरट्याने बँक ग्राहकाच्या पिशवीतून ३३ हजारांची रोकड, ०३ जुलै रोजी देखील पुन्हा एकदा भरदिवसा गंगापूर रस्त्यावर दुचाकीस्वारांनी धुमस्टाईलने महिलेची पोत हिसकावली, ०९ जुलै रोजी परिसरातील वेगवेगळ्या भागातून लाखो रुपये किंमतीचे पशुधन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याशिवाय मोबाईल व दुचाकी चोरी हा प्रकार वैजापूरकरांंसाठी नवीन नाही. या सर्व चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर 'शहरात चोरट्यांची दिवाळी, वैजापूरकरांचे दिवाळे' अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वैजापूरकरांना हवाय 'बाजीराव सिंघम'
शहरासह पोलिस ठाण्यातील चोरीच्या घटनांची संख्या पाहता शहरवासियांच्या उरात धडकी भरली आहे. चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. परिणामी महिलांसह व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. उपरोक्त एकाही घटनेतील चोरटे पकडण्यात यश ठाणेप्रमुखांना आलेले नाही. याशिवाय शहरातील वाढती गुन्हेगारी, गुंडगिरी, चोऱ्यांच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे. एकंदरीत ही परिस्थिती पाहता वैजापूर पोलिस ठाण्यात एका सक्षम व 'बाजीराव सिंघम'सारख्या ठाणेप्रमुखांची आवश्यकता असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.