चोऱ्यांचे सत्र थांबेना; भरदिवसा घडलेली घटना
वैजापूर शहरात काही केल्या चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून पुन्हा एकदा दुचाकीवर आलेल्या सोनसाखळी चोरट्यांंनी भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील दोन तोळयांची सोन्याची पोत हिसकावून नेल्याची घटना ०३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास शहरातील गंगापूर रोडवर घडली. दरम्यान भरदिवसा घडलेल्या या लुटीच्या या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयश्री योगेश कुंदे (३८) या शहरातील विनायक कॉलनीत रहिवासास आहेत. त्यांची मुलगी येथील आरोहन अँँकडमी शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेते. बुधवारी दुपारी शाळेत पालकांची बैठक होती. जयश्री त्या बैठकीला दुचाकीने (स्कुटी) गेल्या होत्या. बैठक पार पडल्यानंतर तशाच त्या शहरातील मुख्य बाजारपेठेत गेल्या. बाजारपेठेतील काम आटोपल्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास त्या गंगापूर रोडने घराकडे परत जाण्यासाठी निघाल्या.
यावेळी मुख्य रस्त्यावरून (गंगापूर रोड) घराकडे गाडी वळवत असताना भरधाव युनिकॉन मोटारसायकलीवर दोघेजण त्यांच्याशेजारी आले व काही समजण्याच्या आत पाठीमागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत हिसकावली. यावेळी जयश्री यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. परंतु दुचाकीवर आलेल्या दोघां भामट्यानी गंगापूरच्या दिशेने धूम ठोकली. याप्रकरणी जयश्री कुंदे यांनी त्यांची ६० हजार रुपये किंमतीची (दोन तोळे) पोत हिसकावल्याची फिर्याद पोलिसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा अज्ञात भामट्यांंविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया स्त्रोत - गुगल