उपजिल्हा रुग्णालयास सरप्राईज भेट
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गलथान कारभाराच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागाचे आरोग्य उपसंचालकांनी वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयास गुरुवारी अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली. त्यांच्या सरप्राईज व्हिजिटमुळे रुग्णालयातील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान अमावस्या - पौर्णिमेला उगवणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची यावेळी आवर्जून हजेरी दिसली.
विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. |
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून तज्ञ डॉक्टरांअभावी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील १७ खाटांंचे अतिदक्षता विभाग बंद पडलेले होते. याशिवाय या विभागासाठी खरेदी करण्यात आलेली निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री,बंद पडलेले सिटीस्कॅन यंत्र, रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा कार्यन्वित नसतानाही काढण्यात आलेली पूर्ण देयके, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न, कंत्राटी कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, सुरक्षारक्षकांचे थकीत वेतन आदी मुद्यांवरून उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळच्या सुमारास आरोग्य उपसंचालक डॉ भूषणकुमार रामटेके यांनी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण विभाग, प्रयोग शाळेची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधत रुग्णालयात उपलब्ध सुविधांबाबत समाधान व्यक्त करून सर्वकाही 'ठिकठाक' असल्याचा निर्वाळा दिला. याशिवाय रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्र लवकरच कार्यन्वित करण्यात येणार असल्याचे सांगितले तर निधी वितरणाबाबत बोलताना शासनाकडून ज्या प्रमाणात निधी येतो त्या पद्धतीने समप्रमाणात रुग्णालयांना निधी वितरित करण्यात येतो. असे त्यांनी सांगितले. प्रलंबित मुद्यांवर चौकशीअंती लवकरच निर्वाळा होईल. असे त्यांनी सांगितले.
आमदारांकडून 'पोस्टमाॅर्टेम'
दरम्यान शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराचे आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत पोस्टमार्टेम' केले होते. या बैठकीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसह रुग्णालयाच्या कारभाराची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर आरोग्य सहसंचालक डॉ सुनिता गोल्हाईत यांनी आरोग्य उपसंचालकांसह अन्य संबधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात यंत्रसामग्री खरेदीत झालेली अफरातफर, बंद पडलेले अति दक्षता विभाग व अन्य पाच मुद्दे आमदार बोरनारे यांनी तक्रारीत उपस्थित केले होते.
अधिकाऱ्यांना 'सुनावले'
आरोग्य उपसंचालकांनी सरप्राईज व्हिजिट असल्याचे सांगितले असले तरी त्यांनी 'रुग्णांशी नीट वागा, चांगली सेवा द्या' अशा विविध मुद्दय़ांवर अधिकाऱ्यांचा *समाचार' घेऊन 'कान' टोचल्याची चर्चाही रुग्णालय परिसरात ऐकावयास मिळाली.
दरम्यान उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराच्या विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले असले तरी तक्रारीच्या अनुषंगाने आजची भेट नक्कीच नसून ही सरप्राईज भेट आहे. या बैठकीत कामकाजाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
- डाॅ. भूषणकुमार रामटेके, आरोग्य उपसंचालक , मराठवाडा