Infuriating | संतापजनक: रुग्णवाहिकेतून नव्हे तर पिकअपमधून रुग्ण घाटीत; नेमकं काय घडलंय बघा!

0

आरोग्यसेवेची 'ऐसी की तैसी'


वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. रुग्णालयातील गलथान कारभाराचे दस्तूरखुद्द आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत 'पोस्टमाॅर्टेम होऊन फारसा फरक पडला नाही. उपजिल्हा रुघनालयात उपचार सुरु असताना अचानक प्रकृती खालावलेल्या रुग्णासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या रुग्णाला चक्क पिकअपमधधून छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत रुग्णालयात हलविण्याची नामुष्की नातेवाईकांवर ओढवली. या घटनेमुळे तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातून रुग्ण पिकअपमधून घाटीत घेऊन जातानाचे छायाचित्र. 


बाबासाहेब साहेबराब जाधव ( वय ३२, रा.सावखेडा ता. वैजापूर ) असे या रुग्णाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बाबासाहेब जाधव यांची बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक प्रकृती खालावली होती. त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याने ते अत्यवस्थ झाले होते. त्यांना तालुक्यातील सावखेडा येथून साधारणतः २५ ते ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वैजापूर शहरातील उपजिल्हा रुघनालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाबासाहेब यांच्यावर प्रथमोपचार केले.


परंतु त्यांना अस्वस्थ वाटून त्रास होऊ लागल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर  येथील घाटीत नेण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. परंतु अर्धातास थांबूनही छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. या परिस्थितीत मात्र बाबासाहेब यांची प्रकृती खालावून त्रास होऊ लागला. शेवटी अथक प्रयत्न करूनही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांनी नाईलाजाने पिकअप (लोडिंग) बोलावून त्यातून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय गाठण्याची नामुष्की ओढवली गेली. या घटनेबाबत रुग्णालय प्रशासन 'हाताची घडी, तोंडावर बोट' ठेवून आहेत. 


उशिरा सुचलेले शहाणपण 

बाबासाहेब जाधव यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपाचार सुरु करण्यात आले होते. परंतु अचानक प्रकृती खालावल्याचे डाॅक्टररांनी त्याला घाटीत ‘रेफर’ करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नातेवाईक गोंधळून गेले. परंतु कदाचित डाॅक्टरांनी अगोदरच घाटी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला असता तर नातेवाईकांची एवढी परेशानी नक्कीच झाली नसती. तसे नातेवाईकांनी बोलून दाखविले. त्यामुळे डाॅक्टरांना सुचलेले शहाणपण म्हणायचे की उपरती? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 


रुग्णालयाचा कारभार कधी सुधारणार

जूलै महिन्याच्या सुरवातीलाच मुंबई येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचे 'पोस्टमाॅर्टेम' केले होते. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले सावंत यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी ताफ्यासह याच महिन्यात भेट देऊन रुग्णालयाची 'झाडाझडती' घेतली. परंतु त्यानंतरही रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा झाली नाही. परिस्थिती 'जैसे थे' आहे. 


रग्णालयच 'व्हेंटिलेटरवर'

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले १०० खाटांंचे उपजिल्हा रुग्णालय सध्या 'आजारी' असल्यासारखी परिस्थिती आहे. डाॅक्टर मुख्यालय सोडून उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करतात. कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री धुळखात पडून आहे. अपुऱ्या रुग्णवाहिका, बंद पडलेली अग्निशमन यंत्रणा हा नेहमीच वादाचा विषय ठरत आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून अतिदक्षता विभाग नावापुरता सुरू झाला असला तरी त्याचा फारसा उपयोग रुग्णांना होतांना दिसत नाही. रुग्णालयात सुविधा सर्व उपलब्ध आहे, परंतु सेवेचा लाभ कुणालाच मिळत नाही. हे मात्र खरे! 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top