पंचायत समितीला कायमस्वरूपी अधिकारी द्या
नेहमीच भोंगळ कारभारासाठी प्रचलित असलेल्या वैजापूर पंचायत समिती कार्यालयास कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करा व नागरिकांची प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावा. या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने येथील पंचायत समिती कार्यालयाबाहेर जागरण - गोंधळ आंदोलन करण्यात आले.
वैजापूर पंचायत कार्यालयाला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्यामुळे सध्या प्रभारी अधिकाऱ्याकडे पदभार आहे. परंतु यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची कामे खोळंबलेली आहे. या पार्श्वभूमीवर ते शासनाच्या विविध योजनेच्या लाभापासून वंचित राहून त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळणाऱ्या शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. यामुळे आधीच मेटाकुटीला आलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. याशिवाय वैजापूर पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती व कर्मचाऱ्यांचा मनमानीमुळे नागरिक त्रस्त आहेत.
त्यामुळे लवकरात लवकर वैजापूर पंचायत समिती कार्यालयास गटविकास अधिकारी उपलब्ध करून द्यावा अन्यथा १५ दिवसांंत छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद कार्यालयात युवक काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस राहुल संत, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहित आहेर, सफल त्रिभुवन, दिगंबर वाघचौरे, प्रविण खाजेकर, सागर थोट,साहेबराव पडवळ, प्रविण जाधव, शाक्यसिंह त्रिभुवन, प्रदिप जाधव, विकास सोमवंशी, भानुदास आढाव आदी उपस्थिती होते.