Loksabha Election 2024 | जिल्ह्याचा 'कारभारी' कोण..? निकालाची उत्कंठा शिगेला, नेत्यांकडून 'देव पाण्यात'

0

 कार्यकर्ते 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर

 

 

वैजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात लोकसभा निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली असून जिल्ह्याचा कारभारी कोण होणार ? याबाबत खुमासदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्ते' अ‍ॅक्टिव्ह मोड'वर आले असून पैजा, शर्यती लागल्या आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विधानसभा निवडणुकीचे समीकरण अवलंबून राहणार असून स्थानिक विविध राजकीय पक्षांचे नेते आपल्याच पक्षाच्या उमेदवार निवडून यावा. यासाठी 'देव' पाण्यात घालून बसले आहेत. 




  औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १३  मे रोजी मतदान घेण्यात आले. निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये लगेच आकडेमोड सुरू झाली. निवडणूक  मतदान ते निकाल जवळपास २० दिवसांचा कालावधी उलटून गेला. निवडणूक संपली तरी त्यावर चर्चा मात्र सुरूच होती. कोण निवडून येणार अन् कोण हरणार? याबाबत चर्चेचे फड चांगलेच रंगले आहे. लोकसभा निवडणुकीवर शहरात सट्टेबाजी जोरात सुरू होती. याशिवाय अनेकांनी पैजा , शर्यती लावल्या.  साधारणतः दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीचा धुरळा सुरू होता. या निवडणुकीच्या धामधुमीत तालुक्यातील दुष्काळ हद्दपार झाला की काय? अशी परिस्थिती पहावयास मिळाली.


 सध्यस्थितीतही तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चा-याचाही प्रश्न बिकट बनला असताना हे गंभीर प्रश्न आपसूकच मागे पडले. निवडणुकीपूर्वी पाणी, चारा, छावण्या व रोजगार आदी प्रश्नांसाठी पक्ष व संघटनाची मागणी  पाहता तालुक्यात दुष्काळ असल्याची जाणीव किमान नागरिकांना होत होती. परंतु लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला अन् त्याचबरोबर दुष्काळाची तीव्रता  अचानकच कमी झाली. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


 गेल्या दोन महिन्यात टंचाई स्थितीवर चर्चा करायला कुणाला वेळच मिळाला नाही. निवडणूक संपल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही  दुष्काळी परिस्थितीची दाहकता जाणवायला लागली. मतदान प्रक्रिया ते निकाल अशा  २० दिवसांचा अंतर असलेल्या कालावधीत निवडणूकीची चर्चा थोडी बाजूली पडली खरी. परंतु गेल्या दोन - तीन दिवसांपासून पुन्हा निवडणूक निकालाच्या चर्चेने जोर धरला आहे. शहरातील पानटप-यांपासून चौकाचौकात,  ग्रामीण भागातील पारापासून ते कुचर ओट्यांवर निवडणूक निकालावर मंथन सुरू झाले आहे. कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आता आकडेमोड सुरू केली आहे. जातीनिहाय मतदारांची मोजणी करून याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होईल? याचे ठोकताळे  सुरू झाले. 


लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा एकदा 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर आले आहे.  निवडणूक काळात महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या विजयासाठी शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाऊसाहेब ठोंबरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, एकनाथ जाधव, कल्याण दांगोडे, बाबासाहेब जगताप, पंकज ठोंबरे तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची 'मशाल' पेटविण्यासाठी उबाठा शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, अॅड. आसाराम रोठे, संजय निकम, डॉ. राजीव डोंगरे व एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या 'पतंगाच्या' गगन भरारासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठे पाठबळ दिले. 


कुचर ओट्यांवर रंगल्या चर्चा 


दरम्यान सेनेचा धनुष्यबाण मैदानातील दोन तगड्या उमेदवारांचे चक्रव्यूह भेदणार का? महाविकास आघाडीची  'मशाल' पेटणार का? एमआयएमचा 'पतंग' गगन भरारी घेणार का?  अशाच चर्चा शहरातील कट्टे व ग्रामीण भागातील कुचर ओट्यांवर रंगल्या असून याबाबत मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


स्थानिक नेत्यांची 'पत' ठरणार.! 


आगामी विधानसभा समोर ठेवून स्थानिक विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी जिवाचे रान केले. त्यामुळे या निकालानंतर ते किती 'खोल' पाण्यात आहे. हेही समजणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे आतापासूनच 'शड्डू' ठोकून आहेत तर दुसरीकडे भाजपचे डाॅ. दिनेश परदेशी, एकनाथ जाधव हे दोघे माघार घेतील. ही शक्यता कमी आहे. उबाठा शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर देखील निवडणूक आखाड्यात असणार आहेच. त्यांनी नव्यानेच उबाठा सेनेत प्रवेश घेतल्यामुळे त्यांना वरिष्ठांसमोर 'सिद्ध' करण्यासाठी निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणूक निकालानंतर कुणाच्या उमेदवारांना किती मताधिक्य मिळते. यावरूनच स्थानिक नेत्यांची 'पत' ठरणार आहे. या निकालावरच आगामी विधानसभा निवडणुकीची समीकरणे अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे सर्वच नेते आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा. यासाठी देव पाण्यात घालून आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top