अपेक्षित पाऊस पडण्याचा अंदाज
गतवर्षी वरुणराजाच्या लहरीपणामुळे तालुक्यात खरिपाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसून उत्पन्नात मोठी घट येऊन शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले. यंदा मात्र हवामान खात्याने अपेक्षित पाऊस पडणार असल्याचे भाकित केल्याने वैजापूर तालुक्यात खरिपाचा टक्का वाढणार आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीसह मका, सोयाबीन व अन्य पिकांच्या पेरणी क्षेत्रात ५ टक्क्यांनी वाढ होणार असल्याची शक्यता कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आली आहे. यंदा १ लाख ४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी बियाणे व खतांचा काळाबाजार केल्यास दुकानदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
वैजापूर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ५९ हजार हेक्टर असून यापैकी १ लाख ३९ हजार हेक्टर इतके क्षेत्र पेरणीयोग्य आहे. गतवर्षी झालेल्या कमी पावसामुळे खरिप पिकांची वाताहात झाली. परिणामी बहुतेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेला खर्च देखील निघाला नव्हता. परंतु यंदा हवाखान खात्याने देशासह राज्यात अपेक्षित पाऊस पडणार असल्याचे भाकित केल्याने यावर्षी तरी बऱ्यापैकी उत्पन्न हाती लागेल. अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दरवर्षी तालुक्यात कापूस व मका या पिकांच्या पेरणीचा टक्का मोठा असतो. त्याखालोखाल शेतकऱ्यांकडून सोयाबीन, बाजरी, मुग, तूर आदी पिके घेतली जातात.
मागील वर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ६५ हजार ९८६ हेक्टर कापूस, ४८ हजार ८०५ हेक्टर मका, ३ हजार ९०७ हेक्टर सोयाबीन, ३ हजार ४३८ हेक्टर बाजरी, ३ हजार २०१ हेक्टर ऊस, २ हजार ८६७ हेक्टर मूग, २ हजार २७८ हेक्टर पालेभाजा,२ हजार ५१५ हेक्टर तूर, १ हजार ६३६ हेक्टर फळबाग,१ हजार ६०८ हेक्टर चारा, १०८ हेक्टर इतर तृणधान्य, ७२ हेक्टर इतर कडधान्य, ५६ हेक्टर इतर गळीत धान्य असे एकूण १ लाख ३९ हजार ३५९ इतक्या हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली होती.
यंदा यामध्ये वाढ होऊन कापूस ६९ हजार २८५ हेक्टर, मका ५१ हजार २४५ हेक्टर , सोयाबीन ४ हजार १०२ हेक्टर, बाजरी ३ हजार ६०९ हेक्टर, ऊस ३ हजार ३६१, मूग ३ हजार १० हेक्टर, भाजीपाला २ हजार ३९१ हेक्टर, तूर २ हजार ६४० हेक्टर, फळबाग १ हजार ७१८ हेक्टर, चारा १ हजार ६८८ हेक्टर, इतर तृणधान्य ११३ हेक्टर, इतर कडधान्य ७५ हेक्टर, इतर गळीत धान्य ५८ हेक्टर असे एकूण १ लाख ४६ हजार ३२७ (अंतर पिकासह) इतक्या हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे.
आंतरपिकांमुळेच क्षेत्र वाढणार
तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्र एक लाख ३९ हजार हेक्टर आहे. परंतु यंदा आंतरपीक घेण्यावर शेतकऱ्यांचा जास्त भर घेणार असल्याचा अंदाज गृहीत धरून लागवडीचे क्षेत्र एक लाख ४६ हेक्टरपर्यंत जाणार असल्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
खरिप पेरण्यांना वेग
मान्सून ( नैऋत्य मौसमी वारे) महाराष्ट्रात दाखल झाला असून तालुक्यातही पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. तालुक्यातील बहुतांश भागात मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कपाशीची लागवड करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत मोठा पाऊस झाल्यास खरिप पेरण्यांना वेग येणार आहे.
कपाशी बियाणांची ३ लाख ५० हजार पाकिटे उपलब्ध असून ५१ हजार २४२ मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. पैकी ४६ हजार १९२ इतके अवंटन मंजूर झाले आहे. कृषी सेवा केंद्र चालकांनी कुठल्याही बियाणे व खतांचा साठा अथवा काळाबाजार करू नये अन्यथा त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. यावर लक्ष ठेवण्यासाठी पाच सदस्यीय भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी देखील दुकानदारांकडे विशिष्ट वाणांची मागणी करू नये. दुकानदारांनी बियाणाची लिंकीग (जोड विक्री) करू नये. यासंबंधी शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी थेट कृषी विभागाशी संपर्क करावा.
- व्यंकट ठक्के, तालुका कृषी अधिकारी, वैजापूर