Proverbial | मानाचा तुरा: वैजापूरचे बसस्थानक मराठवाड्यात 'भारी'

0

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ अभियान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संपूर्ण देशात स्वच्छता अभियानाला अनन्य साधारण महत्त्व देऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे. 'स्वच्छ भारत , सुंदर भारत' नारा देत गेल्या काही वर्षांपासून स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. याच धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाकडून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात आले. महामंडळाच्या राज्यस्तरीय समितीकडून १४७ बसस्थानकांची पाहणी करण्यात आली. यामध्ये वैजापूर बसस्थानकाने विभागीय पातळीवर म्हणजेच मराठवाडा विभागात बाजी मारून तिसरा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे या बसस्थानकाच्या लौकिकात मानाचा तुरा खोवला गेला अन् संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची मान अभिमानाने उंचावली आहे. 

 


खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत लालपरीची प्रवासी सेवा अधिक सुकर व्हावी. बसस्थानक परिसरात प्रवेश केल्यानंतर प्रवाशांना स्वच्छ ,सुंदर , प्रसन्न व आनंदी वाटले पाहिजे. हा मुख्य हेतू ठेवून राज्य परिवहन महामंडळाकडून हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात आले. मुख्यमंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ५८० बसस्थानकात हे अभियान सुरू आहे. ही स्पर्धा शहरी विभाग- अ वर्ग, निमशहरी विभाग- ब वर्ग, ग्रामीण विभाग-क वर्ग या तीन विभागातील बसस्थानकात घेण्यात आली. 


मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती अशा सहा प्रादेशिक विभागात  स्पर्धा पार पडली. यामध्ये शहरातील मुख्य बसस्थानक, तालुका बसस्थानक व ग्रामीण भागातील गावागावांतील बसस्थानकांची स्वच्छता व सुशोभिकरणाचा समावेश करण्यात आला होता. यातर्गंत नुकत्याच राज्यातील २५० आगारातील 'अ' वर्गातील १४७ बसस्थानकांची राज्यस्तरीय समितीने पाहणी केली. यामध्ये वैजापूर येथील बसस्थानकाचीही पाहणी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय समितीने केली होती. समितीने वैजापूर बसस्थानकातील स्वच्छता, रंगरंगोटी, प्रवाशांच्या सोयीसाठी केलेल्या उपाययोजना, सेल्फी पॉईंट, वाहतूक नियंत्रक कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष, प्रवासी आरक्षण कक्ष, पुरुष व महिला स्वच्छतागृह, चालक-वाहक विश्रांतीगृह, आरक्षण खिडकी, पास विभाग चौकशी खिडकीची पाहणी करुन गुणांकन दिले होते. त्या पाहणीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात  वैजापूर आगाराने मराठवाडा विभागात तिसरा क्रमांक पटकाविला असल्याचे घोषित करण्यात आले. 


शहराच्या लौकिकातही पडली भर

दरम्यान या अभियानात मराठवाडा विभागात वैजापूर बसस्थानकाने तिसरा क्रमांक पटकावून शहराच्याही लौकिकात भर पाडली आहे. स्वच्छतेचे नियोजन , अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकजुट व मेहनतीच्या बळावरच यशाला गवसणी घालता आली .


या अभियानातर्गंत सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बसस्थानक स्वच्छ, सुंदर व नीटनेटके केले. आमच्या सर्वांची मेहनत फळाला आली . त्याचा परिपाक म्हणजे आमच्या आगाराच्या बसस्थानकास विभागीय पातळीवरील तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

- गोपाळ पगारे, सहायक वाहतूक अधीक्षक तथा बसस्थानकप्रमुख,वैजापूर 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top