समृद्धी महामार्गावरील घटना
नाशिक जिल्ह्यातील वडागंळी येथून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव जाणाऱ्या स्काॅर्पिओ कारने पाठीमागून आयशरला धडक दिल्याने तीनजण जागीच ठार तर अन्य चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना ७ जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावरील अगरसायगाव शिवारात घडली. मृतांमध्ये दोन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे तर जखमींमध्ये दोन वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे. अपघातात गंभीर दुखापत झाल्याने चारही जखमींवर वैजापूर येथे प्रथमोपचार करून पुढील उपचार्थ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, स्काॅर्पिओच्या धडकेने आयशरची मागील दोन्हीही चाके निखळून पडली.
वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव शिवारात झालेल्या अपघातात स्काॅर्पिओचा असा चुराडा झाला. |
कुमारी योगेश जाधव (२२ रा. धासवडे तांडा, टाकळीराजा ता. खुलताबाद) , कमला बन्सी राठोड (४०),बन्सी धोंडीराम राठोड ( ४५ ) दोघेही रा. जांभळी तांडा,बिडकीन ता. पैठण अशी अपघातात ठार झालेल्यांची तर रामसिंग वनसिंग राठोड (३० ), शीतल वनसिंग राठोड (२४), नेहा वनसिंग राठोड (२२) सर्व रा. जांभळी तांडा, बिडकीन ता. पैठण व मयंक योगेश जाधव (२ वर्षे) रा. धासवडे तांडा, टाकळीराजा ता. खुलताबाद अशी जखमींची नावे आहेत.
याबात अधिक माहिती अशी की, जाधव व राठोड कुटुंब नाशिक जिल्ह्यातील वडागंळी येथून देवदर्शन करून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावरून स्काॅर्पिओमधून घराकडे परतत होते. वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव शिवारात आल्यानंतर स्काॅर्पिओने आयशरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने स्काॅर्पिओमधील कुमारी व कमला या दोन महिलांसह पुरूष जागीच ठार तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्ग पोलिस संजय जारवाल व प्रमोद गराड यांनी महामार्गावरील रुग्णवाहिकेस कळवून घटनास्थळी बोलावून घेतले. याशिवाय वैजापूर येथून अन्य दोन रुग्णवाहिका बोलावून सर्वांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता यातील तिघांना तपासून डाॅक्टरांनी मृत घोषित केले तर अन्य चौघांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
'ते' पोलिस कर्मचारी
दरम्यान मुंबई येथील कळंबुरी पोलिस ठाण्यात कर्मचारी असलेले योगेश जाधव हे स्काॅर्पिओ चालवित होते. ते पत्नीसह मुलगा व सासू - सासऱ्यांना घेऊन येत असताना ही घटना घडली. या घटनेत जाधव यांनी पत्नीसह सासू - सासऱ्यांना गमावले. अपघातानंतर रणजित चव्हाण ,अमोल बोरनारे, वाहेद पठाण, यासिन शहा, नदीम शेख, महेश बुणगे आदींनी मदत केली. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
चिमुकल्यालाही गंभीर दुखापत
योगेश जाधव यांचा दोन वर्षांचा चिमुकला मयंक हाही या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. एकंदरीत रुग्णालयातील भयावह चित्र पाहून कुणाचेही हृदय पिळवटून जाईल. असे होते. चालक तथा पोलिस कर्मचारी योगेश जाधव यांना डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
'काळ' त्यांची वाट बघत होता
नाशिक जिल्ह्यातील वडागंळी येथील सीतामाता मंदिरातून जाधव व राठोड कुटुंब कंदुरीचा कार्यक्रम उरकून घरी परतण्यासाठी निघाले खरे. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याच्या पुढे असलेल्या अगरसायगाव शिवारात काळ त्यांची वाट बघत होता. हे त्यांनाळ ठाऊक नव्हते. स्काॅर्पिओने धडक दिल्यानंतर आयशरची दोन्हीही चाके तर निखळून पडलीच. परंतु स्काॅर्पिओचा चक्काचूर झाला आहे.
'त्या' घटनेची आठवण
शुक्रवारी स्काॅर्पिओ - आयशरचा जिथे अपघात झाला. तेथून अलिकडच्याच जांबरगाव टोलनाक्यावर १२ आॅक्टोबर २०२३ रोजी टेंपो ट्रॅव्हल्स उभ्या ट्रकवर आदळून नाशिकचे १४ भाविक ठार झाले होते. ते परभणी जिल्ह्यातील सैलानीबाबांच्या दर्शनाहून नाशिककडे परतत असताना रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. यानिमित्ताने त्या घटनेची आठवण ताजी झाली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका संपायला तयार नसून दोन दिवसाआड अपघात होतच असतात.