Crime | पुन्हा 'तेच' एटीएम फोडून ११ लाख लांबविले; गॅस कटरचा वापर, कॅमेऱ्यावर मारला स्प्रे

0

वैजापूर शहरातील घटना 



वैजापूर शहरातून जाणाऱ्या नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील म्हसोबा चौकातील आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडून चोरट्यांनी ११ लाख ३९ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना १ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी अगोदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडून रक्कम काढली. दरम्यान मागील पाच महिन्यात याच बँकेचे एटीएम फोडल्याची ही दुसरी घटना आहे. भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 



 


         याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील म्हसोबा चौकात आयडीबीआय बँकेची शाखा आहे. बँकेत गोविंद निर्मळ ( रा. बाभळेश्वर, ता.राहता जि. अहमदनगर, ह.मु.म्हसोबा चौक, वैजापूर) हे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. बँकेलगत असलेल्या एका गाळ्यात एटीएम मशीन देखील आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते बँकेत हजर झाले. रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास त्यांनी बँक बंद केली तर लगतच असलेल्या एटीएम मशीन असलेल्या गाळ्याचे शटर देखील बंद केले होते. 


आयडीबीआय बॅंकेचे चोरट्यांनी फोडलेले ते हेच एटीएम मशीन.


दरम्यान शनिवारी सकाळी आठ वाजता एटीएम असलेल्या गाळ्याचे शटर तोडून चोरी केली झाल्याची  महिती बँकेचा सुरक्षारक्षक योगेश सोनवणे याने व्यवस्थापक गोविंद निर्मळ व सहायक व्यवस्थापक संजीवकुमार त्रिनाथ बेहरा ( रा. शासनअंबागाम ता. हिंजीलिकट जि. गंजाम, ओरिसा ह.मु. म्हसोबा चौक) या दोघांना दिली. या तिघांनी बँकेत जाऊन बघितले असता एटीएम मशीन असलेल्या गाळ्याचे शटर तोडून आत ठेवलेले एटीएम व सीडीएम मशीन गॅस कटरच्या साह्याने कापून त्यातील ११ लाख ३९ हजार रुपये चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरीच्या या घटनेदरम्यान चोरट्यांनी वीजपुरवठा खंडीत करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला आणि त्यानंतर डल्ला मारून फरार झाले. याप्रकरणी व्यवस्थापक गोविंद निर्मळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एटीएम फोडणारा चोरटा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


वीजपुरवठा केला खंडित 


 चोरट्यांनी क्लृप्ती लढवून अतिशय शिताफीने हा डल्ला मारला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसू नये म्हणून अगोदर स्प्रे मारून नंतर वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर गॅस कटरने एटीएम मशिन फोडले. विशेष म्हणजे नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी चौकात ही शाखा आहे. ३१ मे रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिस ठाणेही येथूनच जवळ आहे. अलिकडच्या काळात चोरीची ही सर्वात मोठी घटना असून या घटनेमुळे वैजापूरकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.




चोरटा कॅमेर्‍यात कैद 


चोरटा एटीएममध्ये शिरल्यानंतर त्याच्याजवळ स्प्रेसह अन्य साहित्य हातात दिसून आले. तोंडाला काळा रूमाल बांधलेला असून अगोदर तो दोन्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारताना दिसतो. इथपर्यंत सर्व काही व्यवस्थित दिसते. परंतु स्प्रे मारल्यानंतर पुढे कॅमेरा बंद झाला. परंतु असे असले तरी तो स्पष्टपणे दिसून चोरट्याचा प्रताप कैद झाला. त्याच्यासोबत आणखी कुणी साथीदार होते किंवा नाही. याचा उलगडा मात्र यातून होत नाही. 


पाच महिन्यात दुसरी घटना


दरम्यान १६  जानेवारी रोजी रात्री देखील चोरट्यांनी याच बँकेचे एटीएम फोडून १६ लाख रुपये लांबविले होते. चोरट्यांनी त्यावेळी अशीच क्लृप्ती वापरून  एटीएम मशिन गॅस कटरच्या साह्याने कापून तिजोरीसह १६ लाख रुपये चोरुन नेले. चोरट्यांनी एटीएममध्ये असलेल्या कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला व  बँकेतील वीजपुरवठा खंडीत करून चोरी केल्याचे समोर आले होते. या घटनेतील चोरट्यांचा अजूनही पोलिसांना तपास लागलेला नसतानाच ही दुसरी घटना घडली.


पोलिसांसमोर मोठे आव्हान 


शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून दोनदा रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. एकाच बँकेचे चोरट्यांनी पाच महिन्यांत दोनदा एटीएम फोडले. विशेष म्हणजे पोलिस ठाणे येथून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे या घटनेतील चोरट्यांना शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

 

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top