Silver Stolen | चोरट्यांचा पुन्हा 'धमाका', 'चांदी'चोरांनी सराफा दुकान फोडले!

0

पावणे तीन लाखांचे दागिने पळविले

 

वैजापूर शहराती आयडीबाय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी ११ लाख ३९ हजार रुपये लांबविल्याची घटना ताजी असताना चोरट्यांनी पुन्हा सराफा दुकान फोडून मोठा धमाका केला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका सराफा दुकानातून चोरट्यांनी पावणेतीन लाख रुपये किंमतीचे सहा किलो वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना ८ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरासह परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिस यंत्रणा चोरटे पकडण्यासाठी सपेशल अपयशी ठरली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. 

 

वैजापूर शहरातील याच सराफा दुकानातून चोरट्यांनी चांदी लंपास केली. 

        याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश शंकरलाल ब बहिरूवाले (रा.सोनारगल्ली, संतोषी माता मंदिर, वैजापूर) यांचे शहरातील साखरे चौकात सराफा दुकान आहे. शुक्रवारी रात्री आडे आठ वाजेपर्यंत त्यांनी दुकानात काम केले व त्यानंतर दुकान बंद करून ते घरी केले. दुकान बंद करतांना दुकानासमोरील चॅनल, त्या समोरील लोखंडी  व लाकडी असे एकापाठोपाठ असलेले दरवाजांना  कुलूप लावले. शनिवारी सकाळी परिसरातील एका व्यापाऱ्याने बहिरूवाले यांना फोन करून दुकानाचा लाकडी  व लोखंडी दरवाजा खुला असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास महेश त्यांचे भाऊ व पुतण्या सोबत दुकानात गेले.




 यावेळी लाकडी दरवाजची मिजागिरी तोडून लोखंडी दरवाजाला लावलेले कुलूप तोडलेले त्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय दुकानाबाहेर काही चांदीचे दागिने देखील पडलेले असल्याचे त्यांना दिसून आल्याने दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी वैजापूर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी येऊन दुकानात जाऊन पाहणी केली असता ६ किलो २०० ग्रॅम वजनाचे २ लाख ७९ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी  गेल्याचे महेश बहिरूवाले यांना समजले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




चोरीसाठी चोरीचीच दुचाकी 


दरम्यान चोरीच्या या घटनेत चोरटयांनी चोरीची मोटारसायकल वापरल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी शहरालगत असलेल्या नारंगी प्रकल्प गाठून तेथे चोरी केलेली मोटारसायकल सोडून तेथून दुसऱ्या मोटारसायकलने चोरटे पसार झाले.


पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह 


शहरातील म्हसोबा चौकात असलेल्या आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडून चोरट्यांनी ११ लाख ३९ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना ३१ मे रोजी रात्री घडली होती. ही घटना ताजी असतानाच आठ दिवसांच्या आतच चोरट्यांनी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सराफा दुकान फोडून स्थानिक पोलिसांना मोठे आव्हान दिले आहे. गेल्या काही दिवसांतील चोऱ्यांच्या घटना पाहता पोलिस यंत्रणा नेमकी काय करते? असा प्रश्न वैजापूरकरांना पडला आहे. एटीएम'फोडे' पोलिसांच्या हाती लागलेले नसतानाच चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर 'टिच्चून' सराफा दुकान फोडले. याशिवाय बसस्थानक परिसरातून दागिन्यांची चोरी, भरदिवसा रक्कम पळविणे या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. एकंदरीत या घटना पाहता ठाणेप्रमुखांसह पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


चोरट्यांचा प्रयत्न फसला 


दरम्यान साधारणतः १० ते १२ दिवसांपूर्वी चोरट्यांनी हेच सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा डाव उधळला गेला. परंतु चोरट्यांनी हिंमत न हारता पुन्हा तेच दुकान 'लक्ष्य' करून घटनेला परिणाम दिला. या वृत्तास पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top