Loksabha Election: 'सर'सेनापतीसह भाजप नेत्यांचा 'वरचष्मा'; विधानसभा मतदारसंघातही युतीचीच 'झेंडा'

0

संदीपान भुरेंचा दमदार विजय


औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी विजयश्री खेचून आणली. भुमरेंच्या विजयात वैजापूरकरांनी सिंहाचा वाटा उचलून त्यांना विजयासाठी ९३ हजार २२१ मते दिली. अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या तुलनेत भुमरेंना जवळपास ४० हजारांच्या मतांची आघाडी मिळाली. त्यांच्या या विजयामुळे शिंदेसेनेचे 'सर'सेनापती तथा आमदार रमेश बोरनारे यांच्यासह भाजप नेत्यांचा 'वरचष्मा' झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आ. बोरनारेंना जितकी मते मिळाली जवळपास तेवढीच मते भुमरे यांना मिळाली. 




 

गेल्या दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीचा धुरळा सुरू होता.  ४ जून रोजी निवडणूक निकाल घोषित करण्यात आला. या अनपेक्षित व धक्कादायक निकालामुळे राजकीय वर्तुळ अक्षरशः ढवळून निघाले. विशेषतः वैजापूर विधानसभा मतदारसंघात सेनेचे चंद्रकांत खैरे व एमआयएमचे इम्तियाज जलील या दोन उमेदवारांमध्येच चुरशीच्या लढत होईल. असे चित्र रंगविले गेले होते. परंतु या अनपेक्षित निकालामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह राजकीय विश्लेषक चांगलेच तोंडघशी पडले. वैजापूर विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर निकालपूर्व चाचणीतही ( एक्झिट पोल) कुठेच स्थान दिले गेले नसतानाही भुमरेंनी मारलेली बाजी पाहता कौतुकास्पद म्हणावी लागेल.


 परंतु असे असले तरी भुमरेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली सभा, वैजापूरचे शिंदेसेनेचे आमदार तथा 'सर'सेनापती आमदार रमेश बोरनारे यांच्यासह भाजप नेते डाॅ. दिनेश परदेशी, एकनाथ जाधव, कल्याण दांगोडे, बाबासाहेब जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) नेते भाऊसाहेब ठोंबरे, पंकज ठोंबरे आदी सरदारांनी जिवाचे रान करून घेतलेली मेहनतही भुमरेंच्या पथ्यावर पडलीच. विशेषतः आमदार बोरनारे व डाॅ. परदेशींच्या मतदारसंघात असलेल्या तगड्या नेटवर्कमुळे भुमरेंना मोठा फायदा झाला. परिणामी भुमरेंना विधानसभा मतदारसंघातून ९३ हजार २३१ मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे दुसर्‍या क्रमांकावर राहिले असले तरी विधानसभा मतदारसंघात त्यांना तिसऱ्या तर पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. या दोघांना अनुक्रमे २५ हजार २१३ व ५६ हजार २०७ इतकी मते मिळाली. या दोघांच्या तुलनेत भुमरेंनी अनुक्रमे ६८ हजार १८ व ३७ हजार २४ मतांची आघाडी घेतली.


 गेल्या लोकसभा निवडणुकीत खैरेंना विधानसभा मतदारसंघातून ६६ हजार ६७१ तर जलील यांना ३५ हजार ४६२ मते मिळाली होती. यंदा मात्र खैरे १० हजार ४११ तर जलील १० हजार २४९ मतांनी पिछाडीवर असून या दोघांनाही मोठा फटका पडला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांना मतदारसंघातून १० हजार ५३४ मते मिळाली. हर्षवर्धन जाधवांनाही गेल्यावेळी मतदारसंघातून ५५ हजार ५५४ मते मिळाली होती. एकंदरीतच गेल्या निवडणुकीच्या तुलनेत खैरे व जलील यांच्या मतांमध्ये घट झाली. त्यावेळी खैरेंसोबत भाजप व जलीलसोबत वंचित आघाडी होती. खैरेंना उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे व जलील यांना एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांची सभाही तारू शकली नाही. 


याशिवाय खैरेंच्या पाठीशी उबाठा शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, संजय निकम, अॅड. आसाराम रोठे, डॉ. राजीव डोंगरे आदी नेते व कार्यकर्त्यांची भक्कम फळी होती. असे असतानाही ते विधानसभा मतदारसंघात दुसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. दरम्यान भुमरेंच्या विजयासाठी बोरनारे व डाॅ. परदेशी या जोडगोळीने मेहनतही तितकीच घेतली. याशिवाय विधानसभा मतदारसंघात झालेल्या विकासकामांनाही मतदार विसरले नाहीत. रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी विविध योजनांच्या माध्यमातून केलेली विकासकामे त्यांच्या पथ्यावर पडलीच. याशिवाय बोरनारेंचा विकासकामांचा सपाटा पाहून मतदाररांनीही त्यांच्यावर विश्वास टाकलाच. एकंदरीत सर्वच भक्कम बाजू भुमरेंच्या विजयासाठी सोयीस्कर होऊन विजय दृष्टीपथात आला. असे म्हणता येईल. 


बोरनारेंनाही मिळाली होती हिच मते 


सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेना - भाजप युतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांनी ९८ हजारांपेक्षा जास्त मते घेऊन विजयश्री खेचून आणली होती. एव्हाना तिच परिस्थिती या लोकसभा निवडणुकीत बघावयास मिळाली. बोरनारेंना विधानसभा निवडणुकीत जी मते मिळाली होती. तेवढीच मते जवळपास भुमरेंना मिळाली. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अर्थात याचे श्रेय आ. बोरनारे यांच्यासह डॉ. परदेशी यांच्या चमूला द्यावे लागेल.


मतदारसंघात युतीचेच प्राबल्य 


 लोकसभा निवडणुकीत वैजापूर विधानसभा मतदारसंघात  सेना - भाजप युतीच्या उमेदवारास ९३ हजार २३१ मते मिळाली. महाविकास आघाडीच्या उमेदवारास ५६ हजार २०७ मते मिळाली. याचाच अर्थ मतदारसंघात सेना - भाजप युतीचे प्राबल्य असल्याचे दिसून आले. गेल्या विधानसभा निवडणुकीतही युतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांना भरघोस मते मिळाली. म्हणजेच मतदारसंघात युतीचे एक लाख मतदान आहे. हेच येथे अधोरेखित होते. आगामी विधानसभा निवडणुकीत जो कुणी युतीचा उमेदवार असेल त्याचा मार्ग सुकर झाला आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top