आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागासाठी खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेला असून गेल्या आठ महिन्यांपासून रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे . दरम्यान आमदार बोरनारेंच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश दिले आहेत. बोरनारेंना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅक्टर नसल्याने ते बंद असून उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराचा पाढाच या बैठकीत वाचला.
वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासंदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी उपस्थित शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे. |
याबाबत अधिक माहिती अशी की , वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्यासंदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. वैजापूरचे शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे हेही या बैठकीस उपस्थित होते. वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागासाठी तीन कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतु हा विभाग गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्यामुळे तालुक्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
खरेदी केलेल्या यंत्रसामग्रीत मोठ्या प्रमाणावर अफरातफर करून मलिदा लाटण्यात आला आहे. याशिवाय रुग्णालयातील गलथान कारभाराची आ.बोरनारे यांनी पोलखोल केली. रुग्णालयातील कंत्राटी वर्ग ४ चे कर्मचारी, नर्सिंग स्टाफ व सुरक्षारक्षकांचे गेल्या ८ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. रुग्णालयातील स्वच्छता व धुलाईसाठी वीस लाख रुपयांची मंजुरी असताना मागील ८ महिन्यांपासून जिल्हा शल्यचिकित्सकांकडून उपजिल्हा रुग्णालयास निधी आलेला नाही. या ठिकाणी असलेल्या सर्वच रुग्णवाहिका इंधनाअभावी बंद आहेत. सी.टी. स्कॅन यंत्रही बंद पडले आहे. रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी २४ लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतु सदरील यंत्रणा परिपूर्ण अवस्थेत नसतनाही संबंधितानी पूर्ण देयके काढून घेतली. त्यामुळे येथील अग्निशमन यंत्रणा बंद अवस्थेत आहे. रुग्णालयात शासनामार्फत होणाऱ्या कामांसाठी रुग्णालयाची ना रकत न घेता निधी वितरीत केला जात असल्याची तक्रारही बोरनारेंना या बैठकीत केली.
दरम्यान या बैठकीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक प्रत्यक्षात हजर नव्हते. परंतु नंतर त्यांनी आॅनलाईन बैठक अटेंड केली. मात्र त्यांचे प्रतिनिधी या बैठकीसाठी हजर होते. आमदार बोरनारेंच्या तक्रारीनंतर आरोग्यमंत्र्यांनी संबधित सर्वच अधिकाऱ्यांना फैलावर घेत जाब विचारला. उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभारात सुधारणा करा. अशी सक्त ताकीद देऊन जिल्हा शल्य चिकित्सकांच्या गलथान कारभारासह अतिदक्षता विभागासाठी खरेदी करण्यात आलेल्या गैरव्यवहाराची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश आरोग्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिले.
आमदारांकडून कारभाराची लक्तरे
डाॅक्टराअभावी तालुक्यातील पाच ते सहा प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रांना टाळे ठोकले आहे. परिणामी ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत संबधितांना कळवूनही दखल घेतली गेली नाही. अशी तक्रार करून आमदार बोरनारे यांनी आरोग विभागाच्या कारभाराची लक्तरेच या बैठकीत टांगली. यासंदर्भात बोरनारेंनी लेखी तक्रारही आरोग्यमंत्र्यांकडे केली.
वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग तीन वर्षांपासून बंद असून यंत्रसामग्री खरेदीत मोठा गैरव्यवहार झालेला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हा शल्य चिकित्सकांकडून रुग्णालयासाठी निधी आलेला नाही. अग्निशमन यंत्रणा बंद , इंधनाअभावी रुग्णवाहिका उभ्या असतात. या मी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
- प्रा.रमेश बोरनारे, आमदार,वैजापूर