काळजाचा ठोका चुकविणारी आकडेवारी
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा व तितकीच धाकधूक ह्रदयाचे ठोके चुकवित होती. प्रत्येक क्षणाला येणारी वेगवेगळी उमेदवारांच्या मताधिक्याची आकडेवारी पाहता काळजाचा ठोका चुकविणारी होती. दरम्यान संदिपान भुमरेंनी तुल्यबळ उमेदवारांना धोबीपछाड देत 'मामा' बनविल्याची चर्चा शहरात आहे.
शिंदेसेनेचे संदीपान भुमरे यांच्या विजयानंतर वैजापुरात जल्लोष करण्यात आला. |
४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याने वैजापूर शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी आदल्या दिवशीच आपापली कामे उरकून सकाळपासून निकालाच्या अपडेटबाबत उत्सुक होते. दूरदर्शन संचासह मोबाईल अशा आपापल्या सोयीनुसार सर्वांनीच अपडेट्स मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ सामसूम होती तर ग्रामीण भागातील नागरिकांचीही नेहमीप्रमाणे शहरात वर्दळ दिसून आली नाही. एकंदरीत प्रत्येकालाच निवडणूक निकालाची उत्कंठा होती.
शिवसेनेचे उमेदवार संदिपान भुमरे, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील की उबाठा शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे? यावर मात्र ठिकठिकाणी चर्वितचर्वण सुरू होते. सुरवातीला खैरेंनी आघाडी घेतल्यानंतर स्थानिक उबाठा शिवसेनेत आनंदाचे भरते आले तर भुमरेंनी मात करून खैरेंना पिछाडीवर टाकल्यानंतर शिंदेसेनेत आनंदाची भरती - ओहोटी आली. एमआयएमचे इम्तियाज जलील जेव्हा दोघांना 'ओव्हरटेक' करून पुढे गेले तेव्हा स्थानिक कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. क्षणाक्षणाला उत्कंठा.. धाकधूक.. अन् जल्लोष असे वातावरण शहरात पहावयास मिळाले. परंतु असे असले तरी उमेदवारांचे वाढते - घटते मताधिक्य बघून स्थानिक नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या काळजाचे ठोके चुकवित होते. प्रत्येक फेरीगणिक उमेदवारांच्या मताधिक्याचा आकडा वेगवेगळा येत असल्यामुळे अनेकांचे अंदाज मोडीत निघायचे. ज्या उमेदवारांनी मताधिक्य घेतले. त्या पक्षांचे कार्यकर्ते फटाके फोडून जल्लोष करीत होते.
परंतु दुपारनंतर भुमरेंनी जेव्हा सर्वांनाच मागे टाकून विजयी अश्वमेधाचा घोडा सुसाट पळविला. तेव्हा मात्र अन्य राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांचे चेहरे 'सुतकी' होऊन आनंदाला ओहोटी लागली. अपवाद वगळता जवळपास नंतरच्या काही फेरीपासून भुमरेंनी खिंड लावून धरली होती. शेवटपर्यंत ते मताधिक्य ठेवण्यात यशस्वी राहिले. एक्झिट पोलनुसार ( निकालपूर्व चाचणी) भुमरे त्यांच्या यादीत कुठेच नव्हते. परंतु त्यांनी घेतलेली मतांची 'भरारी' पाहून सर्वांचीच बोटे आपसूकच तोंडात गेली. छत्रपती संभाजीनगर शहराचा इतिहास पाहता आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकीत तेथील मतदारांनी खैरेंनाच पाठबळ दिले होते. खैरेंच्या शहरात भुमरे त्यांना मात देतील. असे कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते.
दुपारनंतर जेव्हा भुमरेंनी ३० ते ३५ हजारांचे मताधिक्य घेतले. परंतु हे मताधिक्य घटेल ही अपेक्षा ठेवून 'तग' धरून होते. परंतु मताधिक्याचा आकडा लाखाच्यावर गेल्यानंतर स्थानिक विरोधी पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी हातपाय 'गाळले'. खैरेंनी मतमोजणी केंद्र सोडल्याचे वृत्त येऊन धडकताच स्थानिक पातळीवरही सर्वांची खैरेंच्या विजयाची 'आशा' मावळली. हीच परिस्थिती इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांची होती. खैरे आखाड्यातून बाद झाल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर जलील भुमरेंचे मताधिक्य घटवतील. अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांना असतानाच तेही भुमरेंपुढे फार काळ मैदानात 'बॅटिंग' करू शकले नाहीत. एकंदरीत भुमरेंनी शेवटपर्यंत प्रतिस्पर्धी उमेदवारांना धोबीपछाड देत विजयी पताका फडकावली. भुमरेंनी घेतलेले मताधिक्य व त्यांचा विजय पाहता त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना 'मामा' बनविल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
शहरात फटाक्यांची आतषबाजी
दरम्यान संदिपान भुमरे विजयी झाल्यानंतर शिवसेना व भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली. याशिवाय घोषणाही दिल्या. यावेळी शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे, भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भागीनाथ मगर, संगीता बोरनारे, पंकज ठोंबरे, अमोल बोरनारे, डॉ. परेश भोपळे, शिवलिंग साखरे, प्रशांत कंगले, कमलेश आंबेकर, कपिल खैरे, प्रेम राजपूत, गणेश सावंत आदी उपस्थित होते.