तर्कवितर्कांना आले उधाण
वैजापूर तालुक्यातील कांगोणी व डवाळा शिवारात शेतात आकाशातून पांढऱ्या रंगाच्या डब्यासह फुगा झेपावल्याच्या सलग दोन घटना घडल्या . या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . दोन घटना घडूनही पोलिस व महसूल प्रशासनाला याचा अद्याप उलगडा झालेला नाही. प्रशासन अजूनही गाफिल आहे. त्यामुळे सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. केवळ सुस्त राहून हा उलगडा होणार नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास नागरिकांमधील भीती आणखी वाढत जाईल .
वैजापूर तालुक्यातील कांगोणी व डवाळा शिवारात सापडलेले ते हेच यंत्र. |
वैजापूर तालुक्यातील कांगोणी शिवारात आकाशातून शेतात पांढऱ्या डब्यासह फुगा झेपावल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती २६ जून रोजी तालुक्यातील डवाळा शिवारात दुपारच्या सुमारास घडली. तालुक्यातील डवाळा शिवारात दुपारच्या आकाशातून पांढऱ्या रंगाच्या डब्यासह फुगा झेपावल्याची पुनरावृत्ती झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील कांगोणी शिवारातील शेतात पांढऱ्या रंगाच्या डब्यासह फुगा झेपावल्याची घटना २२ जून रोजी घडली होती. या घटनेची चर्चा संपत नाही तोच पुन्हा २६ जून रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील डवाळा शिवारात पांढऱ्या डब्यासह फुगा झेपावल्याची घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शेतात पडलेले साहित्य पुणे येथील हवामान विभागाच्या कार्यालयाकडे हे यंत्र तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान गेल्या चार दिवसांत सातत्याने अशा दोन घटना घडल्या आहेत. हा नेमका काय प्रकार आहे? याचा उलगडा कुणालाच व्हायला तयार नाही. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल व पोलिस यंत्रणा केवळ नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन करीत असली तरी सातत्याने असे का होते? या प्रश्नाचे उत्तर मात्र प्रशासनाकडे नाही. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करून एकदाचा सोक्षमोक्ष लावावा. अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.
..तर घटनेच्या मुळाशी जावे लागेल
या दोन्हीही ठिकाणी आढळून आलेल्या यंत्रावर 'मेड इन कोरिया' लिहिलेले आहे. यंत्रावर दुसर्या देशाचे नाव आढळून आल्याने परिसरातील नागरिकांचा संशय बळावून भीती निर्माण झाली आहे. पोलिस यंत्रणा केवळ पंचनामे करून नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु असे असले तरी पोलिसांच्या उत्तरावर नागरिकांचे समाधान व्हायला तयार नाही. प्रशासनाने केवळ न घाबरण्याचे आवाहन नागरिकांना करून जमणार नाही तर या प्रकरणाचा उलगडा करून नागरिकांना विश्वास देणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणा केवळ यंत्र हवामान खात्याकडे पाठवून मोकळी झाली. त्यामुळे हा पेच सुटेल. याची सुतराम शक्यता नाही. यंत्रणेला या घटनेच्या मुळाशी जावे लागणार आहे. सातत्याने याच परिसरात अशा घटना का होतात ? शेतात पडलेले साहित्य नेमके कशाशी निगडित आहे ? घातपाताचा काही कट तर नाही ना ? या सर्व शक्यता तपासणे गरजेचे असल्याची अपेक्षा नागरिकांची आहे.
सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न
मुळातच शेतात आढळून आलेले साहित्य हवामान खात्याशी संबंधित आहे किंवा नाही. या निष्कर्षाप्रत ना पोलिस यंत्रणा पोहोचली ना महसूल यंत्रणा. त्यामुळे हवामान खात्याकडे पाठवून उपयोग होईल का? हाही प्रश्न अनुत्तरित आहे. केवळ गुगलवर सर्च करून पोलिसांनाही सापडलेले यंत्र हवामान खात्याशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या अंदाजावरून एखाद्या निष्कर्षाप्रत पोहोचणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागेल. काही नागरिकांनी हा घातपात घडविण्याच्या उद्देशाने केलेला हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिस व प्रशासनातील अधिकाऱ्यांना या घटनेचा क्ल्यू अथवा आकलन व्हायला तयार नाही. तिथे सामान्य नागरिकांच्या आकलनाच्या पलिकडे ही बाब आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांऐवजी तज्ज्ञ व स्वतंत्र पथकाकडे सोपविण्याची मागणी होत आहे.
दुष्काळात तेरावा महिना
वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी व चोऱ्यांच्या सत्रामळे ग्ग्रामी भागात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच दुष्काळात तेरावा महिना म्हणून की या दोन घटनांची भर पडली. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी भीती निर्माण झाली. गुन्हेगारी व चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात ठाणेप्रमुख सपशेल अपयशी ठरले असून दिवसेंदिवस चोऱ्याचपाट्या वाढतच चालल्या आहेत. ग्रामीण भागात नव्हे तर शहरातही भररस्त्यावर कुणीही दादागिरी , हाणामाऱ्या व दारू पिऊन वाहने आडवा किंवा चालवा. अशी परिस्थिती आहे. गुंडाचा उच्छाद , अवैधधंदे , पत्ते व मटक्यांचे अड्डे बेफाम सुरू आहे . परिणामी शहरात गुंडगिरी फोफावत चालली आहे. पोलिस मात्र या गुंडांना सोडून सामान्यांना कायदा बडगा दाखविण्यात मर्दुमकी गाजवित आहेत .