Drunken Police | दंडेलशाही..! बारचालकाने बिअर दिली नाही; मद्यधुंद पोलिसाचा 'धिंगाणा', फ्रीस्टाईल हाणामारी

0

वैजापूर शहरातील घटना 


पोलिस म्हणजे कायद्याचे रक्षक समजले जातात. परंतु तेच जर कायद्याचे उल्लंघन करून 'गुंडगिरी'वर येत असेल तर याला काय म्हणावे ? असा प्रश्न नक्कीच सामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. एका प्रतापी पोलिसाने दारू पिऊन नशेत तर्राट होऊन एका हाॅटेल चालकावर दादागिरी केल्याची घटना २७ जून रोजी राञीच्या सुमारास वैजापूर शहरात घडली. एवढेच नव्हे तर बारमालकाला मारहाण करीत मदिरालयाच्या शटरलाही लाथाबुक्की करून नंगानाच केला. बारचालकाची सटकल्यानंतर दोघांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी होऊन दोघेही जखमी झाले .विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यासोबत वाळूमाफियांची टोळीही होती. या घटनेची शहरात खुमासदार चर्चा रंगली आहे.

 



त्याचे झाले असे की , वैजापूर पोलिस ठाण्यातील एक पोलिस कर्मचाऱ्यास दारू पिण्याची इच्छा झाली. परंतु रात्रीचे ११ वाजलेले असल्यामुळे आता कोठे जावे ? असा प्रश्न पडला. अगोदरच 'त्या' पोलिसाने 'एकच प्याला' म्हणता - म्हणता अनेक अनेक 'प्याले' रिचविलेले होते. असे असतानाही प्यायलेल्या अवस्थेत त्या पोलिसाला आणखी मदिरा प्यायची इच्छा झाल्याने त्याला शहरातील येवला रस्त्यावरील हाॅटेल आशेचा 'किरण' दिसला खरा. परंतु आपण तेथे गेल्यानंतर 'गोरे'चे काळेनिळे होऊ याची त्याला सुतराम शक्यता वाटली नव्हती. 


तेथे हाॅटेलमध्ये गेल्यानंतर पोलिसांच्या प्रतिमेची 'शान' घालविली. येवला रस्त्यालगत असलेल्या बिअर बार आहे. गुरुवारी रात्री बार मालकाने नेहमीप्रमाणे रात्री अकरा वाजता हॉटेल बंद केले. हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री बार बाहेर श्वानांचा भुंकण्याचा आवाज सुरू झाला. हा आवाज कानी पडताच हॉटेलचा कामगार तेथे आला. मद्याधुंद अवस्थेतील पोलिसाने हॉटेल कामगाराला 'दोन बिअर दे' अशी मागणी केली. परंतु 'बार बंद झाले' असे त्या हॉटेल कामगाराने त्याला उत्तर दिले. परंतु बिअर न मिळल्याने त्या पोलिसाचे 'पित्त' खवळले अन्  त्याच्यातील पोलिस 'जागा' होऊन शिवीगाळ करण्यास सुरवात केली. 


या घटनेची माहिती कामगाराने बारमालकास फोनवरून कळविली असता बारचालक देखील तेथे आले. धिंगाणा घालणारा इसम दुसरा तिसरा कुणी नसून वैजापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलि हवालदारच असल्याचे जेव्हा बार चालकाच्या निदर्शनास आले तेव्हा तोही आवाक झाला. बारचालकाने पोलिसाला 'बार बंद झाले आहे.' असे बोलून समजविण्यास सुरवात केली. परंतु तो कर्मचारी काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने बारचालकाला देखील शिवीगाळ करत लोटालोट करून धक्काबुक्की करून धमकाविले. मात्र त्यानंतर बार चालकाचा देखील पारा सटकला अन् दोघांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. 


या हाणामारीत पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्याला तर हॉटेल चालकाच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर रात्री एक वाजेच्या सुमारास या दोघांनीही येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी विकास सोनवणे यांनी त्या दोघांवर उपचार करून त्यांची सुट्टी केली. दोघांच्या नावाची नोंदही रुग्णालयात आहे. बारचालक व पोलिस कर्मचाऱ्यात झालेल्या या घटनेबाबत परिसरातील नागरिकांनी देखील दुजोरा दिला आहे. घटनेबाबत ठाणे प्रमुखांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी काॅल रिसीव्ह केला नाही. दरम्यान या घटनेमुळे शहरात खुमासदार चर्चा रंगली आहे.


ठाण्याच्या अब्रूची लक्तरे वेशीवर 

'तो' पोलिस कर्मचारी दारू पिण्यासाठी गेला खरा. परंतु त्याच्यासोबत वाळूमाफियांची टोळीही होती. पोलिसांची प्रतिमा अगोदरच मलिन झालेली असतानाच वैजापूर पोलिस ठाण्यातील पोलिसाच्या या प्रतापामुळे ठाण्याच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. याचा दुसरा अर्थ ठाणेप्रमुखांचेही कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. असाही होतो.


'तो' पोलिस कर्मचारी कोण ?

गेल्या सहा महिन्यांपासून शहरात चोऱ्या, लुटालूट, मोटारसायकल, मोबाईल, रोकड व महिलांचे दागिने चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली असून पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना ताज्या असताना आता पुन्हा एका पोलिस कर्मचाऱ्याचा नवीन प्रताप समोर आला आहे. बिअरसाठी हॉटेल चालकाला दमबाजी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला  बार चालकाने चांगलाच प्रसाद दिला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर 'तो' पोलिस कर्मचारी नेमका कोण ? अशी चर्चा सुरू आहे.

छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top