वैजापूर न्यायालयाचा निकाल
मुलबाळ होत नाही म्हणून विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
राजू शामराव काटकर (३६, रा.गणेशनगर, रांजणगाव शेणपुंजी ता.गंगापूर) असे शिक्षा सुनविण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील मयत छाया हिचा २०१० मध्ये राजू काटकर याच्यासोबत विवाह पार पडला. लग्नाच्या वेळी तिचे वडील तुळशीराम यांनी १ लाख ७५ हजार रुपये हुंडा व संसारपयोगी साहित्य दिले होते. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी काही दिवस तिला बऱ्यापैकी नांदविले. परंतु त्यानंतरच्या काळात ते तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले.
दरम्यान छाया व तिचा राजू हा कामानिमित्त एमआयडीसी वाळूज येथे आले व तिथेच राहू लागले. दरम्यान छायाला मुलबाळ होत नाही म्हणून सासरची मंडळी तिला वांझोटी म्हणत तर राजू दारू पिऊन मुलबाळ होत नाही म्हणून इलाजासाठी माहेराहून पैसे आण. अशी मागणी करून तिचा छळ करत. याशिवाय सासू व सासरा छाया हिस नेहमी मारहाण करीत असत. या सर्व जाचाला कंटाळून छाया हिने ५ सप्टेंबर २०१७ रोजी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी तिचे वडील तुळशीराम खिल्लारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती राजू काटकर, शामराव काटकर (सासरा), शांताबाई काटकर(सासू), गजानन काटकर(दीर), लताबाई खिल्लारे(नणंद), उत्तम खिल्लारे (नंदोई) यांच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासी अंमलदार आरती जाधव यांनी पोलिस उपनिरीक्षक सविता तांबे यांच्या साहाय्याने प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्याद, साक्षीपुरावा आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी.सी.मंझा यांनी केलेला मुद्देसुद युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायधीश एस.के.उपाध्याय यांनी आरोपी राजू काटकर यास कलम ३०६ प्रमाणे सात वर्ष सश्रम कारावास, ३ हजार रूपये दंड व कलम ४९८(अ) प्रमाणे तीन वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास ६ महिने अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा सुनावली तर अन्य आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अँड जी.सी. मंझा यांनी तर पैरवी म्हणून सहायक फौजदार दत्तात्रय गवळी यांनी काम पाहिले.