२८ तासानंतर आले यश
नांदूर मधमेश्वर कालव्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला १४ वर्षीय शाळकरी मुलगा वाहून गेल्याची घटना ३ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरानजीकच्या रोठी परिसरात घडली होती. दरम्यान तब्बल २८ तासानंतर त्याचा मृतदेह शोधण्यास यश आले. रोठी परिसरातील पाईपलाईनमध्ये हा मृतदेह अडकलेला होता,
साद इम्रान पटेल ( १४ रा. इंदिरानगर, वैजापूर) असे मृत मुलाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील इंदिरानगर परिसरातील रहिवासी साद पटेल हा त्याच्या अन्य तीन मित्रांसोबत शहरानजीक असलेल्या रोठी परिसरातील नांदूर मधमेश्वर कालव्यात पोहण्यासाठी गेले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास तो अचानक वाहून गेल्यानंतर त्याच्या अन्य मित्रांनी तेथून धूम ठोकून या बाबीची माहिती नागरिकांना दिली. त्यानुसार नागरिकांनी घटनास्थळी जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो सापडला नाही.
तदनंतर काही वेळाने नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेसह पोलिसांचा ताफाही तेथे गेला. परंतु सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्याला शोधण्यात यश आले नव्हते.दुपारी एक वाजेपासून शोधकार्य सुरू होते. रात्री ७.३० वाजेनंतर शोधकार्य थांबविण्यात आले होते. दरम्यान ४ जून रोजी सादच्या नातेवाईकांनी अग्निशमन वाहनचालक वसीम शेख यांच्यासह अन्य पोहणारे सोबत नेऊन त्यांच्यामार्फत कालव्यात त्याचा शोध घेतला असता काल ज्या ठिकाणाहून तो वाहून गेला होता. त्याच परिसरातील पाईपलाईनखाली त्याचा मृतदेह आढळून आला.