११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शेतीच्या वादातून ट्रॅक्टर अंगावर घालून लाठ्याकाठ्यांसह कुऱ्हाड व कोयत्याने वार करून एका ५५ वर्षीय इसमाचा खून केल्याची खळबळजनक घटना वैजापूर तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भावकीमधील सदस्यांमध्येच हा 'राडा' झाला असून या घटनेत १५ ते १८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पेत्रस हरकू सोनवणे (५५ रा.गाढेपिंपळगाव) असे घटनेतील मृताचे नाव आहे तर अरुण आंतावण सोनवणे, आनंद आंतावण सोनवणे, सुशिल आनंद सोनवणे, बाळू दगडू सोनवणे, साहेबराव दगडु सोनवणे, अनिल दगडू सोनवणे, शांतावण दगडू सोनवणे, प्रवीण बाळू सोनवणे, विलास बाळू सोनवणे, गौरव अजित सोनवणे, राजेश अनिल सोनवणे (सर्व रा. गाढेपिंपळगांव, ता.वैजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मृत पेत्रस सोनवणे |
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बाबू हरकू सोनवणे हे तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. बाबू व त्यांचे भाऊ पेत्रस यांचा मागील काही दिवसांपासून घटनेतील आरोपी यांच्याशी शेत जमीनीबाबतचा वाद न्यायप्रविष्ट होता. दरम्यान याबाबतचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याने ५ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते मुलांसह शेत नांगरण्यासाठी शेतात गेले होते. नेमके याचवेळी त्या ठिकाणी अरुण, आनंद, सुशिल, बाळू, साहेबराव, अनिल, शांतावण, प्रविण, विलास, गौरव, राजेश हे सर्वजण तिथे आले. या सर्वांनी बाबू, त्यांचे भाऊ पेत्रस, पुतणे व इतरांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून लाठ्याकाठ्यांसह कोयता, कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेत पेत्रस हे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान घटना घडताच पोलिसांनी अरुण, बाळू, विलास व गौरव सोनवणे या चौघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी बाबू सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण ११ जणांविरुद्ध वीरगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी करीत आहेत.
जखमींवर उपचार सुरू
दरम्यान या घटनेत १८ जण जखमी झाले असून यातील काही जणांवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात तर वैजापूर व अन्य वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.