सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वैजापूर शहरातील म्हसोबा चौकात असलेल्या आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल ११ लाख ३९ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना ३१ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. याशिवाय १६ जानेवारी रोजी रात्री चोरट्यांनी याच बँकेचे एटीएम फोडून तब्बल १६ लाखांची रोकड लंपास केली होती. या घटनेतील चोरट्यांचा अजूनही शोध लागलेला नसतानाच ही दुसरी घटना घडल्याने शहरातील एटीएम मशिनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील सर्वच बॅकांच्या एटीमची सुरक्षा 'रामभरोसे' असून याची संधी साधूनच एटीमफोडे सक्रिय झाले आहेत. दरम्यान या 'एटीएम'फोड्यांना पकडण्यासाठी पोलिसांना अद्याप धागेदोरे मिळाले नाही. त्यामुळे या भामट्यांना पकडण्यासाठी आणखी किती दिवस लागणार? प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.
शहरातील छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या म्हसोबा चौकातील आयडीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडून चोरट्यांनी ११ लाख ३९ हजारांच्या रकमेवर डल्ला मारला. यापूर्वीही म्हणजेच १६ जानेवारी रोजी याच बँकेचे एटीएम फोडून १६ लाख लांबविले होते. याच रात्री कन्नड तालुक्यातील चापानेर येथेही एटीएम फोडून भामट्यांनी २२ लाख पळविले होते. या तिन्हीही घटनेतील साधर्म्य म्हणजे चोरी करताना गॅस कटरचा उपयोग करण्यात आला होता. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर अगोदर स्प्रे मारून नंतर वीजपुरवठा खंडित करून घटनेला परिणाम देण्यात आला. त्यामुळे हे भुरटे चोर नसून सराईत व हायटेक यंत्रणा असलेली ही टोळी असावी. असाही अंदाज पोलिसांचा आहे.
वैजापूर येथील बहुतांश बँकांच्या शाखेत दिवसा सुरक्षारक्षक असतात. रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नसल्यामुळे चोरट्यांना डल्ला मारणे सहज व सोपे होत आहे. एखाद्या चित्रपटात कथानक दाखवले जाते. अगदीं त्याच पद्धतीने हे सर्व घडले. त्यामुळे चोरट्यांनी बॅंक व परिसरातील सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करूनच या प्रत्यक्ष कृती केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रत्यक्षात एकच चोरटा दिसत असला तरी त्याच्या सोबतीला आणखी चोरटे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. जो चोरटा कॅमेऱ्यात कैद झाला. त्याने तोंडाला काळे फडके बांधलेले आहे. त्यामुळे या टोळीपर्यंत पोलिसांना पोहोचणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे. गेल्या पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेचे अद्याप पोलिसांना काहीच धागेदोरे मिळालेले नाही. त्या घटनेचा तपास लागलेला नसतानाच ही घटना घडल्याने स्थानिक पोलिस यंत्रणा चक्रावून गेली आहे.
गेल्या काही वर्षांत वाढते शहरीकरण व लोकसंख्या पाहता 'पारंपरिक' सुरक्षा यंत्रणेत बदल करण्याची आवश्यकता आहे. पोलिस यंत्रणेपेक्षा चोरट्यांची यंत्रणा हायटेक झाल्याचे गेल्या दिवसांपासून पहावयास मिळते. त्या तुलनेत पोलिस यंत्रणा आहे तिथेच बघायला मिळते. बँक प्रशासनानेही केवळ पोलिस यंत्रणेच्या भरवशावर न राहता स्वतःची भक्कम व हायटेक यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. केवळ पोलिस यंत्रणेच्या भरवशावर राहून एटीएम मशीन रामभरोसे सोडणे कितपत योग्य आहे? हाही प्रश्न आहे. पोलिस ठाण्यातील अपुरे मनुष्यबळ पाहता त्यांनी कुठे - कुठे लक्ष द्यायचे? याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे रक्कम चोरी झाल्यानंतर नेहमीच पोलिसांना दूषणे देऊन त्यांच्यावर खापर फोडले जाते. शहर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी एटीएमच्या सुरक्षिततेसाठी बँकांनी हातभार लावायला पाहिजे. हेही तितकेच सत्य आहे.
दोन पथके नियुक्त
एटीएम फोडून रक्कम लंपास केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके नियुक्त करण्यात आली असून या पथकामार्फत एटीएम फोड्यांचा शोध घेण्यात येत आहे. 'एटीएम'फोडे परराज्यातील असण्याची शक्यता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
एकाच एटीएमसाठी सुरक्षारक्षक
शहरात भारतीय स्टेट बँकेच्या दोन शाखांसह बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी व आयडीबीआय बँकांची एटीएम सुविधा उपलब्ध आहे. यापैकी फक्त एचडीएफसी बँकेच्या एटीएमसाठी रात्री सुरक्षारक्षक दिसून येतो. उर्वरित सर्वच बँकांच्या एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पहावयास मिळते.