शिऊर येथील दुकानावर कारवाई
चढ्या दराने बियाणांची विक्री करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील कृषी सेवा केंद्रचालकावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे. ८६५ रुपये किंमत असलेला वाण १३०० रुपये ग्राहकाकडून घेताना कृषी सेवा केंद्र चालकाला पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या दुकानाचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान या कारवाईमुळे चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गणेश कृषी सेवा केंद्र ( शिऊर) असे या कारवाई करण्यात आलेल्या दुकानाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिउर येथील गणेश कृषी सेवा केंद्रचालक जास्तीच्या दराने कपाशीचे बियाणे विक्री करीत असल्याची तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली होती, त्यानुसार तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊर येथील गणेश कृषी सेवा केंद्रावर बनावट (डमी) ग्राहक पाठविला असता कापसाच्या कबड्डी वाणाचे बाजारभाव किंमत ८६५ रुपये असताना दुकानदाराने तेच बियाणे रुपये १३०० प्रति पाकिट त्या बनावट ग्राहकाला विक्री करताना पथकाने रंगेहात पकडले. तालुकास्थरिय भरारी पथकातील पंचायत समितीचे कृषी अधिकारी जगदीश वाघमारे, अशोक बिनगे व अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
धाबे दणाणले!
या कारवाईमुळे शहरासह ग्रामीण भागातील दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर गणेश कृषी सेवा केंद्र चालकाच्या दुकानाचा परवाना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी सांगितले.
खबरदार.! फसवणूक कराल तर..
दरम्यान खरिप हंगाम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या पथकामार्फत शहरासह तालुक्यात कृषी सेवा केंद्रावर करडी नजर ठेवून कसून तपासणी सुरू आहे. त्यामुळे दुकानदारांनी काही गडबड करण्याचा प्रयत्न केल्यास धडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कुणीही मखलाशी करून शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न करू नये. असा सज्जड दमच अधिकाऱ्यांनी दिला आहे.
शहर अथवा तालुक्यातील कोणताही दुकानदार शेतकऱ्यांना जास्तीच्या भावाने कपाशी बियाणे विक्री करीत असेल. बियाणे साठा असताना शिल्लक नाही सांगणे व लिंकिंग प्रकार आढळून आल्यास अथवा व काही अनियमितता आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.
- व्यंकट ठक्के, तालुका कृषी अधिकारी, वैजापूर