रोठी परिसरातील घटना
मित्रांसोबत नांदूर मधमेश्वर कालव्यात पोहण्यासाठी गेलेला १४ वर्षीय शाळकरी मुलगा वाहून गेल्याची घटना ३ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वैजापूर शहरानजीकच्या रोठी परिसरात घडली. दरम्यान तो कालव्यात वाहून गेल्यानंतर त्याच्यासोबत असलेले अन्य तीन मित्र घटनास्थळाहून पळून गेले. अग्निशमन दलासह पोलिस यंत्रणा व स्थानिक नागरिकांनी वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेतला. परंतु रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
रोठी परिसरातील याच कालव्यातून साद वाहून गेला. |
साद इम्रान पटेल ( १४ रा. इंदिरानगर, वैजापूर) असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर शहरातील इंदिरानगर परिसरातील रहिवासी साद पटेल हा त्याच्या अन्य तीन मित्रांसोबत शहरानजीक असलेल्या रोठी परिसरातील नांदूर मधमेश्वर कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. दुपारी १२ वाजेच्या सुमारास तो अचानक वाहून गेल्यानंतर त्याच्या अन्य मित्रांनी तेथून धूम ठोकून या बाबीची माहिती नागरिकांना दिली. त्यानुसार नागरिकांनी घटनास्थळी जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो सापडला नाही.
साद पटेल |
तदनंतर काही वेळाने नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेसह पोलिसांचा ताफाही तेथे गेला. परंतु त्याला शोधण्यात यश आले नव्हते. दुपारी एक वाजेपासून शोधकार्य सुरू होते. दरम्यान गेल्या आठवड्यातच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आले होते. त्यामुळे कालव्याद्वारे सध्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे.
शोधकार्य थांबविले
अग्निशमन यंत्रणेसह पोलिसांनी त्याचा रात्री ७.३० वाजेपर्यंत नांदूर मधमेश्वर कालव्यात शोध घेतला. परंतु त्याला शोधण्यात यश न आल्याने रात्री शोधकार्य थांबविण्यात आले. त्यामुळे त्याचा शोध केव्हा लागतो? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.