हडसपिपंळगाव शिवारातील घटना
कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशावर चाकू हल्ला करून सव्वा लाखांचा ऐवज लुटल्याची घटना १ जून रोजी समृद्धी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील हडसपिंपळगाव शिवारात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज रामचंद वाधवा (३४, रा. कल्याण ता. उल्हासनगर, जि. ठाणे) हे आठवड्यातून दोनदा शिर्डी येथे रहिवासास असलेले त्यांचे मामा दिपल रामत्री यांना भेटण्यासाठी जात असतात. त्यामुळे शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ते कल्याण रेल्वे स्थानकावर पोहचले व तेथून ते नाशिकडे जाण्यासाठी रेल्वेत बसले. सकाळी साडेअकरा वाजता ते नाशिकला पोहोचले.
तेथे पोहोचल्यानंतर ते शिर्डीला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत रस्त्यावर थांबले. यावेळी त्या ठिकाणी कारने (एमएच ०५-९५९३) ३० ते ३२ वर्षाच्या वयोगटातील तिघेजण तिथे आले असता मनोज यांनी त्यांना लिफ्ट मागून 'मला शिर्डीला सोडा' असे सांगितले. त्यांनीही त्यांना कारमध्ये बसवले. दरम्यान त्यांनी मनोजला शिर्डीपर्यँत आणले. परंतु त्यांनी कार काही थांबविली नाही. त्यामुळे संशय आल्याने 'तुम्ही मला कुठे घेऊन चाललात?' असे मनोज यांनी त्यांना हटकले. परंतु त्यातील एकजण त्यांना शिवीगाळ करू लागला व 'तुझ्याकडे किती पैसे आहेत ? ते आम्हाला काढून दे' असे म्हणू लागला.
परंतु त्यांना विरोध करताच एकाने चाकू काढून त्यांच्या डोक्यात वार केला. या दरम्यान भामट्यांनी त्यांच्या बॅगमधील २० हजारांची रोकड, गळ्यातील दोन तोळयांची सोन्याची चेन व त्यांच्याकडे असलेले दोन मोबाईल फोन असा एकूण सव्वा लाखांचा ऐवज लुटूला. त्यानंतर त्यांनी मनोज यांना हडसपिंपळगाव शिवारातील समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक ४७० जवळ सोडून ते निघून गेले. याप्रकरणी वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया स्त्रोत - गुगल