वैजापूर बसस्थानकातील घटना
वैजापूर शहरातील नवीन बसस्थानकातून एका प्रवासी महिलेचे ५९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २३ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनीषा उत्तम गांगुर्डे (रा. नाशिक) या त्यांच्या तीन वर्षांच्या मुलासह २१ मे रोजी एका धार्मिक कार्यक्रमासाठी वैजापूर येथे माहेरी आल्या होत्या. दरम्यान गुरुवारी दुपारी त्या नाशिक येथे जाण्यासाठी शहरातील नवीन बसस्थानकात गेल्या. या ठिकाणी नाशिक बस उभी असल्याने त्यांनी आपल्या मुलासह बसमध्ये प्रवेश केला.
बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी पर्समध्ये ठेवलेली पाण्याची बाटली काढण्यासाठी पर्सकडे बघितले असता त्यांना पर्सची चैन खुली दिसली. यावेळी त्यांनी पर्समध्ये ठेवलेली पावणे दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, अंगठी, मंगळसूत्र व सोन्याची रिंग असे एकूण ५९ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.