मनूर आरोग्य केंद्रातील घटना
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील मनूर येथील (२८ रोजी) प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. दरम्यान डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान शस्त्रक्रियेदरम्यान महिलांना पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करून नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात गोंधळ घातला.
सखुबाई विश्वास मोरे (२७) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील मनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (दि.२८) कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते.यात प्राथमिक आरोग्य केंद्र शिऊर, लोणी खुर्द,औराळा व मनूर अशख चार प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०३ महिलांची डॉ. अशोक बेलखोडे यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या. तालुक्यातील लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आलेल्या नांदगाव तालुक्यातील कासारी इंदिरानगर येथील सखुबाई विश्वास मोरे (वय २७) या महिलेवर मंगळवारी दुपारी तीन वाजता मनूर येथे डॉ.अशोक बेलखोडे यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली होती.
शस्त्रक्रियेनंतर सात ते आठ तासानंतर तिला रात्री साडेदहा वाजता चहा - बिस्कीटे देण्यात आली. त्यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास तिची प्रकृती बिघडल्याने तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना कळविले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य बरवे व सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. परिहार यांनी सखुबाईवर तत्काळ उपचार केले.
परंतु तिचा रक्तदाब कमी (बीपी) झाल्याने तिला रात्री साडेबारा वाजता उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. घाटी रुग्णालयात तिला रात्री एक वाजता दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे सखुबाईचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान यासंदर्भात मनूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश परिहार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नाॅट रिचेबल होते तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरुनाथ इंदूरकर यांनी काॅल घेतला नाही.
पैशांची मागणी
मनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने शस्त्रक्रियेसाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.त्यातच शस्त्रक्रियेसाठी पैशांची मागणी होत असल्याने दुपारच्या सुमारास महिलांच्या काही नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात गोंधळ घातला होता.
डाॅ. अशोक बेलखोडे यांच्या निष्काळजीपणानेच आमच्या नातेवाईक महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित डाॅक्टरांविरुध्द कारवाई करण्यात यावी. डाॅक्टर जरी म्हणत असले की, आमच्या चुकीमुळे काहीच झाले नाही. परंतु शस्त्रक्रियेनंतरच महिला कशी दगावली? याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
- संतोष गोंधळे, नातेवाईक रा. कोल्ही