टँकरचालकांची होतेय चांदी
वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील घोयगाव साठवण तलावातील जलसाठा संपल्याने गेल्या दहा दिवसांपासून शहरातील नागरिक निर्जळी आहेत. नळाला पाणीच न सोडल्यामुळे वैजापूरकरांसमोर जलसंकट उभे ठाकले आहे. दरम्यान पालिकेच्या सर्वच उपाययोजना कुचकामी ठरल्या असून यामुळे शहरवासियांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या दीड महिन्यांपूर्वीच पाणीटंचाईची चाहूल लागली होती. परंतु पालिका प्रशासनाने कागदी घोडे नाचविण्यापलिकडे काहीच केले नाही. परिणामी आज शहर टंचाईच्या खाईत लोटले गेले. ही बाब मात्र पाणी टँकर चालकांच्या पथ्यावर पडल्याने त्यांची चांदी सुरू आहे.
वैजापूर शहराला लगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु गेल्यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे शहरालगतचा नारंगी मध्यम प्रकल्पातील जलसाठा संपला आहे. नारंगीतील जलसाठा संपुष्टात आल्यानंतर वैजापूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यावरच अवलंबून राहवे लागते. यासंदर्भात नाशिक पाटबंधारे विभागाचा वैजापूर नगरपलिकेशी करार झालेला आहे. या करारनुसार पिण्यासाठी दर महिन्याला पालिकेच्या कोपरगाव तालुक्यातील घोयगाव येथील चार साठवण तलावात आवर्तन सोडले जाते. नगरपालिकेच्या घोयगाव येथील १५ कोटी लिटर क्षमता असलेल्या चारही साठवण तलावातील जलसाठाही संपुष्टात आला आहे.
६० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन स्त्रोत आहेत. त्यापैकी नारंगी मध्यम प्रकल्प हा स्त्रोत नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या वर्षात पावसाच्या अवकृपेमुळे हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. दुसरा स्त्रोत म्हणजे नाशिक पाटबंधारे विभागाच्या दारणा समूहातून गोदावरी डावा तट कालव्याव्दारे दर ६० दिवसाला घोयगाव साठवण तलावात सोडण्यात येणारे आवर्तन. त्या साठवण तलावातून पाईपलाईनद्वारे पाणी आणून ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन नळाद्वारे शहरवासियांना पुरविले जाते.
दरम्यान २७ फेब्रुवारीपासून शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. तेव्हापासून त्यात दिवसेंदिवस वाढ होत गेली. पाच दिवस, नंतर सात दिवसाआड शहरवासियांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. आता तर कहरच झाला. गेल्या दहा दिवसांपासून पाणी न सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट झाला आहे. परिणामी नागरिकांवर टँकरचे पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढवली गेली. दरम्यान यासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
टँकर चालकांना 'सुगीचे' दिवस
शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरचालकांनी हिच संधी साधून टँकरचे दर वाढविले आहेत. एक हजार लिटर पाण्याचे टँकर ७०० ते १००० रुपये तर दोन हजार लिटर पाण्याचे टँकर ५०० ते ७०० रुपयांना विकत घ्यावे लागत आहेत. पाणीटंचाईच्या फटका सामान्य नागरिकांना बसला असला तरी दुसरीकडे मात्र टँकर चालकांना 'सुगीचे' दिवस आले आहेत.
उपाययोजना ठरल्या कुचकामी
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ६० टँकरची मागणी केली होती. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ तीन टँकर्संना मंजुरी दिली. सध्या तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठा तोकडा आहे. स्थानिक पातळीवर विंधन विहिरींसह अन्य काही स्त्रोत असले तरी पाण्याच्या मागणीच्या तुलनेत कमी पडताहेत. उन्हाची तीव्रता पाहता दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत चालली आहे. त्या तुलनेत पालिकेच्या सर्वच उपाययोजन कुचकामी ठरत आहे.
तर ही वेळ आलीच नसती
पालिका प्रशासनच्यावतीने शहरातील पाणीबाणीवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असे असले तरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नारंगी मध्यम प्रकल्पातून गेल्या काही महिन्यांत बेसुमार होणारा उपसा वेळीच थांबविला असता तर आज शहरावर ही वेळ आलीच नसती अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.
नियोजनाचा अभाव
नाशिक पाटबंधारे विभागाकडून वेळेत आवर्तन सोडले गेले असते तर शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला नसता. हे जरी खरे असले तरी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करून ठेवल्या पाहिजे होत्या. केवळ कागदी घोडे नाचवून देखावा करण्यात आला. परिणामी नागरिकांवर निर्जळी राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नाशकातून १० मे रोजी आवर्तन सुटल्यानंतरच टंचाई सुसह्य होणार आहे.
छाया स्त्रोत - गुगल