पिकअप वेअरमधून आवर्तन
नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून तब्बल तीन महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर वैजापूरकरांसाठी आवर्तन सोडण्यात आले. सोमवारी म्हणजेच १३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास पिकअप वेअरच्या गोदावरी डाव्या तट कालव्याव्दारे पाणी सोडण्यात आले असून १४ मे रोजी राञीच्या सुमारास पाणी पालिकेच्या घोयगाव येथील ( ता. कोपरगाव) साठवण तलावात दाखल होईल. दरम्यान नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे शहरवासियांना १५ मे पासूनच प्रत्यक्षात पुन्हा तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणार आहे. पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या शहरवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून नाशिक पाटबंधारे विभागाकडून आवर्तन न मिळाल्याने वैजापूरकरांसमोर जलसंकट उभ ठाकले होते. २८ एप्रिल रोजी नगरपालिकेच्या कोपरगाव तालुक्यातील घोयगाव साठवण तलावातील जलसाठा संपुष्टात आला होता. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. टंचाई काळात पालिका प्रशासनाने २२ टँकरव्दारे पाणीपुरवठा करून शहरवासियांची तहान भागवली. टँकरद्वारे उपलब्ध झालेले पाणी शहरातील येवला रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्रात टाकून शहरवासियांना पुरविण्यात येत होते. त्यामुळे काही प्रमाणात का होईना टंचाईवर मात करता आली. वैजापूर शहरास नारंगी मध्यम प्रकल्प व घोयगाव साठवण तलाव हे दोन पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत. शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात गेल्या वर्षी मुबलक प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा संपूर्णपणे नाशिक जिल्ह्यावर अवलंबून आहे. नाशकातून आवर्तन सुटले तरच शहरवासियांची तहान भागली जाते.
वैजापूर नगरपालिकेचा नाशिक पाटबंधारे विभागाशी पिण्याच्या पाण्यासंदर्भात करार झालेला आहे. नाशिक पाटबंधारे विभागाकडून वैजापूर शहरासाठी ६० दिवसाला आवर्तन सोडण्यात येत होते. परंतू नाशिक पाटबंधारे विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून आवर्तन न सोडल्याने वैजापूरकरांची पिण्याच्या पाण्यासाठी फटफजिती झाली. घोयगाव येथील साठवण तलावातील जलसाठा संपल्याने गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली. परिणामी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने पिण्याच्या पाण्याची बोंब झाली. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमध्ये सोडण्यात आले. पिकअप वेअरच्या गोदावरी डाव्या तट कालव्याव्दारे १३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील घोयगाव साठवण तलावात पाणी सोडण्यात आले. नांदूर मधमेश्वर पिकअप वेअर ते घोयगाव साठवण तलावाचे अंतर ७० कि. मी. असून पाणी तलावात पाणी पोहचण्यास साधारणतः २४ तासांपेक्षा जास्त कालावधी लागतो.
१४ मे रोजी रात्रीच्या सुमारास पाणी पोहोचल्यानंतर पाच ते सहा दिवसांत पाचही साठवण तलाव भरले जातील. १४ मे रोजी रात्रीपर्यंत हे पाणी घोयगाव साठवण तलावात पोहचल्यानंतर १५ मेपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीपणे सुरु होणार आहे. उन्हाचा तडाखा अन् त्यात घोयगाव साठवण तलावातील जलसाठा संपुष्टात आल्याने पाणीटंचाईने वैजापूरकर चांगलेच होरपळून निघाले. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचे कारण सांगून नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैजापूरकरांना तब्बल तब्बल महिनाभर तहानलेल्या अवस्थेत ठेवले. नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून घोयगाव साठवण तलावात आवर्तन सोडण्यात आल्याने शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वैजापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
माजी नगराध्यक्षांचा पाठपुरावा
फेब्रुवारी महिन्यात शहरवासियांना आवर्तन सोडल्यानंतर नाशिक पाटबंधारे विभागाकडून पुन्हा आवर्तन सोडले नाही. एकदा आवर्तन सोडल्यानंतर ते ६० दिवस पुरते. २८ एपिस रोजी घोयगाव साठवण तलावातील जलसाठा संपल्याने शहरवासियांना मोठ्या टंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने आवर्तन सोडण्यात आले.
२२ टँकर होणार बंद
शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या २२ टँकर सुरू आहे. तालुक्यातील विविध गावांतील विहिरीवरून टँकर भरण्यात येऊन ते पाणी पालिकेच्या येवला रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्रात टाकून नंतर शहरवासियांना पुरविण्यात येते. नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे आता टँकरने सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तीन दिवसाआड पाणीपुरवठा
दरम्यान एप्रिल अखेरपासून साठवण तलावातील जलसाठा संपुष्टात आल्याने पालिकेने पाणीपुरवठा करण्यास हात आखडता घेतला होता. त्यामुळे नंतर - नंतर शहरवासियांना पाणी मुश्किल झाले होते. परिणामी खासगी टँकरच्या भरवशावर राहून वैजापूरकरांना तहान भागवावी लागली. आता मात्र तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून गोदावरी डाव्या तट कालव्याव्दारे कोपरगाव तालुक्यातील घोयगाव साठवण तलावात १३ मे रोजी रात्रीच्या सुमारास आवर्तन सोडण्यात आले. पालिकेच्या घोयगाव साठवण तलावात पाणी पोहचल्यानंतर १५ मे पासून शहरवासियांचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु होईल. येत्या १५ दिवसांत शहरवासियांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
- भागवत बिघोत, मुख्याधिकारी, वैजापूर