पावसामुळे मंडपात पाणी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरालगतच्या विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात ढिसाळ व नियोजन शून्य कारभाराचे दर्शन घडले. रविवारी मतदान साहित्य घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना चिखल तुडवित साहित्य घेण्याची नामुश्की ओढवली. पावसामुळे मंडप गळाल्याने पाणी होऊन चिखल झाल्याने कर्मचाऱ्यांना तेथेच बसून साहित्य घ्यावे लागले.
वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या मंडपात पावसामुळे असा चिखल झाला. |
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरालगतच्या विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात शासकीय लवाजमा हलवून गेल्या काही दिवसांपासून तेथेच कामकाज सुरू आहे. शनिवारी दुपारनंतर व रविवारी सकाळच्या सुमारास शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावल्याने विनायकराव पाटील महाविद्यालयातील प्रांगणात उभारलेल्या मंडपाचे 'पितळ' उघडे पडले. पावसामुळे पाणी गळून अख्ख्या मंडपात पाणी झाले. त्यामुळे त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.
विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेला मंडप. |
मंडप व आजूबाजूला पाणी साचून चिखल झाल्याने शनिवारी रात्रीच अधिकाऱ्यांनी वाळूसह मुरमाची व्यवस्था करून प्रांगणात टाकण्याची नामुष्की ओढवली. मंडपाच्या आजूबाजूने माती सारून पोळ न घातल्याने मंडपात तेही पाणी शिरले. त्यामुळे रविवारी सकाळी मंडपात चांगलाच 'राडा' झाला होता. नाही म्हणायला मंडपात प्लास्टिकची ताडपत्री टाकली होती. परंतु त्यावरही जाऊन येऊन चिखल झाला. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी साहित्य ताब्यात घेतले. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन भरमसाठ खर्च होत असताना दुसरीकडे पावसामुळे मंडप गळून मोठी वाताहत झाल्याचे पहावयास मिळाले.
त्यामुळे निवडणुकीबाबत 'जबाबदार' अधिकाऱ्यांना कितपत गांभीर्य हे दिसून येते. रविवारी हा दृश्य' बघितल्यानंतर एखाद्या शेतात तुडाताड झाल्यासारखे दिसत होते. निसर्गाची कुणी शाश्वती देऊ शकत नसले तरी सर्व शक्यता गृहीत धरूनच अधिकाऱ्यांनी नियोजन करणे गरजेचे होते. परंतु अवकाळी पावसाने सरकारी कामकाजाच्या ढिसाळ कारभाराचे' 'पितळ' उघडे पाडले. पावसामुळे दाणादाण उडाल्याने चिखलात साहित्य स्वीकारण्याची नामुष्की पत्करावी लागल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मतदान साहित्य रवाना
दरम्यान १३ मे रोजी वैजापूर विधानसभा मतदारसंघातील ३३८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया घेण्यासाठी रविवारी साहित्य रवाना करण्यात आले आहे. ३९ बसेसह ९५ खासगी वाहनांतून हे साहित्य रवाना करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर प्रत्यकी पाच कर्मचारी असे एकूण जवळपास १७०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून काही कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे.