वैजापूर मतदारसंघातील स्थिती
लोकसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी संपून प्रत्यक्षात आज मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. महायुतीसह महाविकास आघाडी एमआयएमच्या उमेदवारांनी प्रचारयंत्रणा राबवून धुरळा उडविला. परंतु असे असले तरी दुभंगलेल्या राजकीय पक्षांमुळे उमेदवारांसह पक्ष कार्यकर्तेही संभ्रमात असूनही विजयाची खात्री कुणालाच नाही.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे पक्ष दुभंगामुळे मतदारांचेही तळ्यात - मळ्यात असून 'कोणता झेंडा घेऊ हाती' अशी अवस्था मतदारांची आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना हक्काच्या कार्यकर्त्यांचा तुटवडा भासल्याने त्यांना नातेवाईकांच्या भरवशावरच प्रचारयंत्रणा राबवून 'नाव' कडेला न्यायाची नामुष्की ओढवली. एकंदरीत सर्वच संभ्रमावस्था असल्याने चित्र स्पष्ट व्हायला तयार नाही.
१६ मार्च रोजी लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीसह महाविकास आघाडी, एमआयएमच्या उमेदवारांनी प्रचारयंत्रणा राबवून मतदारसंघ ढवळून काढला. शेवटपर्यंत जिवाची बाजी लावून प्रचारात जीव ओतला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांनी कधीच लहानसहान गावे, वाड्यावस्त्यांवर जाऊन कधीच प्रचार केला नाही. याशिवाय शहरातील वसाहतींमध्येही कधी प्रचारफेऱ्या केल्या नाहीत. यंदाच्या निवडणुकीत हे खास वैशिष्ट्ये राहिले. उन्हाच्या तडाखामुळे उमेदवारांना प्रचाराचे नियोजन करून त्यानुसार गावोगावी सभा घ्याव्या लागल्या. शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी काही गावांना धावत्या भेटी देऊन प्रचाराची सांगता करावी लागली.
साधारणतः दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेसह पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे. याशिवाय गेल्या वर्षभरापासून नगरपालिकेचाही कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे. परिणामी प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी उमेदवारांना हक्काचे पदाधिकारी, कार्यकर्ते राहिले नाहीत. नाही म्हणायला ते पक्षाला धरून राहिले असले तरी प्रचारासाठी जो 'जोश' असायला हवा होता. तो यंदाच्या निवडणुकीत पहावयास मिळाला नाही. कार्यकर्त्यांच्या फळीचा अभाव दिसून आला. परिणामी विश्वासू कार्यकर्त्यांचा यावेळी 'वाणवा' दिसून आला. त्यामुळे उमेदवारांना पक्षातील प्रमुख नेते व नातेवाईकांच्या भरवशावरच निवडणुकीचा 'गाडा' ओढण्याची नामुष्की येऊन ठेपली.
पैसे, दारूचा महापूर
पैशांच्या महापूरासह दारू व रंगीत - संगीत ओल्या पार्ट्यांना ऊत आला होता. सभेसाठी श्रोते मिळत नसल्याने सर्वच राजकीय पक्षांना 'भाडोत्री' श्रोते आणण्यासाठी धावपळ करावी लागली. त्यातच भरीस भर म्हणून शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईचा 'कहर' झाल्यामुळे या वणक्यात नागरिकांनी सभांकडे पाठ फिरवली. निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासनाने जनतेला वाऱ्यावर सोडले. याशिवाय नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाण्यासाठी उपोषण, आंदोलने सुरू झाली. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली. निवडणुकीसह नांमका आवर्तन व पाणीटंचाई अशा सर्वच बाबींचा पेच निर्माण झाला. अजूनही हे प्रश्न मार्गी लागले नाहीत.
नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी
एकीकडे समस्यांचा डोंगर उभा असतानाच दुभंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमुळे मतदारांसमोरच पेचाची परिस्थिती आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर. एम. वाणी यांनी सन १९९९ पासून ते २०१४ पर्यंत एकहाती सत्ता खेचून विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारास या मतदारसंघातून नेहमीच मताधिक्य मिळालेले आहे. त्याखालोखाल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य राहिलेले आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे व उबाठा शिवसेना, शरद पवार व अजित पवारांची अशा दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोणत्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचे? याबाबत मतदारांसमोर पेच असून 'कोणता झेंडा घेऊ हाती' अशी अवस्था झाली आहे. नाही म्हणायला 'धनुष्यबाण' चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे या जुन्या चिन्हाचा या निवडणुकीत कितपत फायदा होतो. हे मात्र निकालानंतर समजणार आहे.
प्रमुख तीनच नेत्यांच्या सभा
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत वैजापूर येथे मोजक्याच प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या. सुरवातीला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी नंतर उबाठा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे व शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तीन प्रमुख नेत्यांच्या सभा वगळता अन्य कुणाच्याही सभा झाल्या नाहीत. गेल्या निवडणुकीत मात्र बहुतांश नेत्यांची सभांची रेलचेल होती.
'हातचा' राखूनच प्रचार
गेल्या काही दिवसांपासून राजकीय परिस्थिती पाहता कोणता पक्ष कुणासोबत जाईल. याची शाश्वती राहिली नाही. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत कुणाची युती, आघाडी कुणाशी होईल. याचा नेम नाही. त्यामुळे भावी उमेदवार, कार्यकर्ते आमच्याच उमेदवारांना मते द्या. असा आग्रह धरताना दिसले नाही. कार्यकर्त्यांनीही 'हातचा' राखूनच प्रचार केल्याचे पहावयास मिळाले.
छाया स्त्रोत - गुगल