'नांमका'चे आवर्तन लटकले
वैजापूर तालुक्यात उन्हाच्या चटक्याबरोबरच पाणीटंचाईची दाहकताही वाढली आहे. तालुक्यातील ७८ गावांसह १० वाड्यावस्त्यांना ११९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय १०७ खासगी विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील वाड्यावस्त्यांसह गावांमध्ये टँकेरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी होत आहे. त्यामुळे टँकरचा आकडा येत्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात दिवसागणिक टँकरची संख्या वाढत असताना प्रशासनाला टंचाई निवारण बैठकीचा विसर पडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला निर्जळी राहण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीचा 'बुरखा' पांघरून अधिकारी टंचाई समस्यांकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान तालुक्यात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई, नांदूर मधमेश्वर कालवा व तहानलेल्या वैजापूरकरांमुळे अख्खा तालुका तहानेने व्याकूळ झाला आहे.
वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी अशा रांगा लागतात. |
गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात भीषण टंचाई जाणवत आहे. तालुक्यातील प्रमुख दहा लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे. याशिवाय गावागावांतील सार्वजनिक विहिरींसह खासगी विहिरींचे स्त्रोत आटून पाण्याचा ठणठणाट झाला आहे. परिणामी पाण्याचे भीषण दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे पाण्यासाठी जनतेला टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत तालुक्यांतील १६४ गावांपैकी ७८ गावांसह १० वाड्यावस्त्यांना ११९ टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. टँकरसोबत प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी १०७ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.
दरम्यान ऊन तापायला सुरवात झाली आहे. मे महिन्यात अचानक उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ग्रामीण भागात दुष्काळाची दाहकता अधिक जाणवून परिस्थिती अधिक चिंताजनक होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रशासनाने टंचाई निवारणासाठी बैठक घेणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही या बैठकीला मुहूर्त लागला नसल्याने येत्या काही दिवसांत ग्रामीण जनतेला पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागू शकते.
प्रशासन ढिम्म
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील, पंचायत समिती कार्यालयाची संपूर्ण यंत्रणा गुंतून पडली होती. त्यांमुळे तालुक्यातील टंचाईचा मुद्दा बाजूला पडला आहे. याचा ग्रामीण भागातील जनतेला सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन टंचाई निवारणाकरीता गावांगावात नियोजन करणे आवश्यक आहे.
पाणीटंचाईने 'सँडविच'
सध्या तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीच आहे. नांदूर मधमेश्वर कालव्याच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. नाशिक पाटबंधारे विभागाकडून आवर्तन सोडण्यास स्पष्ट नकार मिळाल्याने लाभक्षेत्रातील नागरिकही तहानलेले आहे. याशिवाय शहरातील नागरिकांचा पाणीपुरवठाही नाशिक पाटबंधारे विभागावर अवलंबून आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर पिण्यासाठी आवर्तन मिळाल्याने वैजापूरकरांची तहान काही प्रमाणात आता भागणार आहे. तसेच अख्ख्या तालुक्यात पिण्याच्या पाण्याची बोंब झाली आहे. चोहोबाजूंनी पाण्याच्या समस्येच्या गर्तेत अडकल्याने तालुकावासियांचे चांगलेच 'सँडविच' झाले आहे.
जनता त्रस्त, अधिकारी सुस्त
लोकसभा निवडणुकीमुळे विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह अधिकारी व्यस्त होते तर दुसरीकडे तालुक्यातील जनता पाणीटंचाईने त्रस्त झाली आहे. आता मात्र निवडणूक संपली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. येत्या काही दिवसांत नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच ससेहोलपट होणार आहे. एवढे मात्र नक्की!
टॅंकरग्रस्त गावे - ७८
टँकरग्रस्त वाड्यावस्त्या - १०
खाजगी टँकर - ११९
अध्रिग्रहीत खासगी विहीरी - १०७