Thieves Rampage | चोरटे मस्त, पोलिस सुस्त; भरदिवसा लुटमारीच्या घटना

0

कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे 



 

वैजापूर  शहर व परिसरात चोरट्यांनी आठवडाभरापासून उच्छाद मांडला असून पाठोपाठ होणाऱ्या चोऱ्यांच्या सत्रामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. विशेषतः चोरट्यांनी महिलांना लक्ष्य करीत सोन्याचे दागिने लूटमार करण्याचा सपाटा लावला असून एकाच आठवड्यात चार ते पाच घटना घडल्या आहेत. या सर्व घटना भरदिवसा घडल्या आहेत. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था नावाचा प्रकार अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. त्यामुळे 'चोरटे मस्त, पोलिस सुस्त' असे म्हणण्याची वेळ आली आहे. 





         सुवर्णमाला एकनाथ गायकवाड (रा.वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर ह.मु. जालना) या  २६ एप्रिल रोजी एका लग्न समारंभासाठी शहरात आल्या होत्या. दरम्यान समारंभ आटोपून त्या गंगापूर चौफुलीवर  कारमध्ये बसत होत्या. नेमके याचवेळी धुमस्टाईलने मोटारसायकलीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपये किंमतीचा राणीहार (तीन पदरी) व १ लाख ६० हजार रुपयांची गंठण असे ३ लाख २० हजार रुपये किंमतीचे दागिने हिसकावून नेले. दुसऱ्या एका घटनेत प्रमिला भागचंद पाटणी (७२, रा.कानडी मठासमोर, परदेशी गल्ली) या २६ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील मारवाडी गल्लीतून जात होत्या. यावेळी मोटारसायकलीवर आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किंमतीची सोन्याची पोत हिसकावून पोबारा केला. २६ एप्रिल रोजी सोने ओरबाडून नेल्याच्या दोन घटना घडल्या. 


याशिवाय  तालुक्यातील हिलालपूर येथील रहिवासी नवनाथ बोर्डे हे ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास शहरातील आयडीबीआय बँकेत आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ५० हजार रुपये काढले. या रकमेसह बँकेचे खातेपुस्तक व हिशेबाचे रजिस्टर त्यांनी एका पिशवीत ठेवले. ही पिशवी त्यांनी मोटरसायकलच्या हँडलला लावून ते गाडी घेऊन पंचायत समितीच्या व्यापारी संकुलासमोर आले. या ठिकाणी मोटारसायकल उभी करून ते एका दुकानात खरेदीसाठी गेले व   रोकड असलेली पिशवी त्यांनी तशीच मोटारसायकलाच सोडली. थोड्या वेळानंतर ते गाडीजवळ आले. परंतु हँडलला लटकवलेले अडीच लाख रुपयांची रोकड तोपर्यंत गायब झाली होती. वैशाली जालिंदर कदम (रा.सवंदगाव ता. वैजापूर, ह.मु. हर्सूल सावंगी, छत्रपती संभाजीनगर) या तालुक्यातील जांबरगाव येथे त्यांच्या आत्तेभावाच्या लग्न समारंभासाठी आल्या होत्या.बुधवारी विवाहसोहळा पार पडल्यानंतर ०२ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्या छत्रपती संभाजीनगरला  जाण्यासाठी येथील नवीन बसस्थानकात आल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या पर्समध्ये साडेतीन तोळे सोन्याची गंठन ठेवलेली होती. चोरट्यांनी पर्समधील दागिने लंपास केले. 


लक्ष्मण मंडळ हे भग्गाव येथील रहिवासी असून शेतीव्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. यंदा शेतात त्यांनी कांद्याचे पीक घेतले होते. कांदा काढल्यानंतर शेतात कांदा चाळ नसल्याने त्यांनी मंगळवारी रात्री ४० क्विंटल कांदे शेळके वस्तीवरील त्यांचे मित्र संदीप प्रकाश वाणी यांच्या शेत गट क्रमांक ३४१/१ मधील शेतातील कांदा चाळीत ठेवले होते.  बुधवारी सकाळी साडे सहा वाजता रवींद्र हे शेळके वस्तीवर कांद्याची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले २८ हजार रुपये किंमतीचे चाळीस क्विंटल कांदे, ६ हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटार व ५ हजार रुपये किंमतीचे वायर चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या सर्व घडलेल्या घटनांप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


याशिवाय शहरातील साईपार्कमध्येही रात्रीच्या सुमारास रस्त्यावर शतपावली करणाऱ्या शिक्षिकेच्या गळ्यातील सोने हिसकावून फरार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे डीपी रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी ही घटना घडली. दोघांनी दुचाकीवरुन येऊन जवळपास दीड तोळे सोने हिसकावून धूम ठोकली. एकंदरीत घडलेल्या घटनांच्या वेळा पाहता सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. भरदिवसा व सायंकाळच्या सुमारास चोरट्यांनी लूटमार करून सामान्यांना जेरीस आणले आहेत. त्यामुळे सामान्यांनी रस्त्यावर यायचे की नाही? याबाबत विचार करायला या घटनांनी भाग पाडले आहे. या घटनांतील अद्याप एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. एकंदरीत या घटनांमुळे चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिल्याची चर्चा सुरू आहे. 


पोलिसांना गांभीर्य नाही 


दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडत असताना पोलिसांकडून काय उपाययोजना केल्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर खुद्द पोलिसांकडेच नाही. लोकसभा निवडणुकीच्या कामाचा ताण असल्यामुळे त्यांना याबाबत विचार करायलाच वेळ नाही. सोने ओरबाडणे, रोकड पळविणे या बाबी नित्याचेच झाल्याने पोलिसांच्याही ते अंगवळणी पडत चालले. परिणामी पोलिसांना त्याचे फारसे गांभीर्य राहिले नाही. अशा घटनांत पोलिस फिर्याद घेण्यासाठी तत्परता दाखवित नसल्याचे अनुभव तक्रारदारांचे आहेत.


रस्त्यावरच वाढदिवस साजरे


गेल्या काही दिवसांपासून शहरातील कायदा व सुव्यवस्था ढेपाळली आहे. गुन्हेगारांनी डोके वर काढले असून पत्त्यांचे जुगार, आॅनलाईन जुगार, चोऱ्या, भररस्त्यावर हाणामाऱ्या हे तर नित्याचेच झाले. रस्ता अडवून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. हा ट्रेंड शहरात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रस्ता अडवून वाढदिवस साजरा होत असताना सामान्यांना बाजूला होऊन रस्ता पार करावा लागतो. शहरातील डीपी रोड, ठक्कर बाजार व बहुतांश सार्वजनिक रस्ते वाढदिवस साजरा करण्याचे 'अड्डे' झाले आहेत. परंतु असे होत असताना पोलिस त्यांना हटकत नाही. त्यामुळे खुलेआम हे सर्व चालू आहे.


केव्हाही फटाके फोडा 


हा नंगानाच सुरू असतानाच शहरातील काही तरूण रात्री बेरात्री फटाके फोडून नागरिकांची झोप उडवत आहे. भररस्त्यावर फटाके फोडून शांतता भंग करण्याचा विडा काही उपद्रवी घटकांनी उचलला आहे. याशिवाय रेसर वाहने ( दुचाकी) सार्वजनिक वर्दळीच्या रस्त्यावरून भरधाव चालविण्याचा ट्रेंडही वाढला आहे. या गाड्यांची कित्येकवेळा धावण्याच्या स्पर्धाही बघितल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top