भरदिवसा घडलेली घटना
वैजापूर शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोरून भरदिवसा चोरट्यांनी एकाचे अडीच लाख रुपये लांबविल्याची घटना ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली.याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवनाथ शिवराम बोर्डे हे वैजापूर तालुक्यातील हिलालपूर येथील रहिवासी आहेत. सोमवारी दुपारी ते शहरातील आयडीबीआय बँकेत आले. यावेळी त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ५० हजार रुपये काढले. या रकमेसह बँकेचे खातेपुस्तक व हिशेबाचे रजिस्टर त्यांनी एका पिशवीत ठेवले. ही पिशवी त्यांनी मोटरसायकलच्या हँडलला लावून ते गाडी घेऊन पंचायत समितीच्या व्यापारी संकुलासमोर आले.
या ठिकाणी त्यांनी मोटारसायकल उभी करून ते एका दुकानात खरेदीसाठी गेले. यावेळी रोकड असलेली पिशवी त्यांनी तशीच मोटारसायकलाच सोडली. थोड्यावेळानंतर ते गाडीजवळ आले. परंतु हँडलला लटकवलेली पिशवी दिसून आली नाही. लगेचच त्यांनी आजूबाजूला चौकशी केली. परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.