चणचणीमुळे रचला होता डाव
बॅंकेत रक्कम भरणा करण्यासाठी जाणाऱ्या पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकास मारहाण करून ११ लाख रुपये लुटल्याची घटना २७ मे रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील महालगाव येथे घडली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेला कलाटणी मिळाली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन दिवसांतच या प्रकरणाचा छडा लावला आहे. पंप व्यवस्थापकानेच दोघा चुलत भावांच्या मदतीने लुटीचा बनाव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १० लाखांची रोकड जप्त केली आहे. पैशांच्या चणचणीमुळे आपण हा डाव रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील पेट्रोलपंपावरील व्यवस्थापकाने लुटीचा बनाव करून १२ लाखांवर डल्ला मारला. पोलिसांनी त्याच्यासह अन्य दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. |
गोरख सुनील धारबळे (पंप व्यवस्थापक), प्रशांत बाळू धारबळे व दीपक अप्पासाहेब धारबळे (तिघे रा. कनकसागज ता. वैजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघा भामट्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर - गंगापूर राज्य महामार्गावरील तालुक्यातील महालगाव येथे एचपी पेट्रोलपंप असून या पंपावर कनकसागज येथील गोरख सुनील धारबळे हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास तो पेट्रोल व डिझेल विक्रीच्या माध्यमातून दोन दिवसांत जमा झालेली ११ लाख ३४ हजारांची रोकड घेऊन महालगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दुचाकीने जात होता. यावेळी वैजापूरकडून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोघांनी त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याजवळील ११ लाख ३४ हजार २०० रुपयांची रोकड घेऊन पसार झाले. या आशयाचे कथन गोरख धारबळे याने पोलिसांसमोर केले होते. त्यानंतर त्याने दिलेल्या फिर्यादीवरून वीरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान घटनेनंतर लगेचच छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे सुरू केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. परंतु यातून काहीच निष्पन्न होत नव्हते. त्यामुळे एकूणच पहिल्या दिवसापासूनच पोलिसांची संशयाची सुई ही गोरखभोवतीच फिरत होती. परंतु घटनेनंतर गोरख शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. २९ मे रोजी सायंकाळी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची कसून चौकशी केली.
पोलिसी खाक्या दाखविताच पैशांच्या अडचणीमुळे चुलत भाऊ प्रशांत व बाळू धारबळे या दोघांसोबत मिळून आपण हा चोरीचा बनाव केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी प्रशांत व बाळू या दोघांना कनकसागज येथून उचलून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी दरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेली १० लाख ५ हजार ६०० रुपयांची रोकड जप्त केली. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे, अंमलदार नामदेव शिरसाठ, दीपक नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम, अशोक वाघ, योगश तरमळे, संजय तांदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
डिस्चार्ज होण्याची बघत होते वाट
लुटीच्या या घटनेनंतर पंप व्यवस्थापक गोरख धारबळे याने घटनास्थळी बेशुद्ध पडल्याचा बनाव केला. त्यामुळे त्याला तत्काळ वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु काही कारणामुळे तेथून कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी शहरातील लाडगाव रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान घटनेनंतर तो काहीसा तणावात होता. असे डॉक्टरांचे म्हणणे होते. अखेर बुधवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच त्याला ताब्यात घेऊन काही तासांतच या प्रकरणाचा छडा लावला. पोलिस फक्त त्याला केव्हा डिस्चार्ज मिळतो. याचीच वाट बघत होते.
मिरची फेकल्याचाही बनाव
दरम्यान सुरवातीला गोरख याने मिरची पूड डोळ्यात फेकून आपली लूट केल्याचा बनाव केला होता. परंतु मिरची फक्त दुचाकीच्या हँडल व घटनास्थळी टाकून तसा दिखावा केला. वास्तविक पाहता त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकलेली नव्हती. असे पोलिसांचे म्हणणे आहे. जेव्हा ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी दिवसभर तपास केला असता तेव्हा त्यांना काहीच आढळून आले नाही. त्यामुळे पहिल्या दिवसापासून पोलिसांची संशयाची सुई गोरखभोवती फिरत होती. त्यामुळे रक्कम कुणी लुटली हे पिक्चर पहिल्याच दिवशी पोलिसांना स्पष्ट झाले होते. तीन दिवस दवाखान्यात राहूनही तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच.