अनेक प्राण्यांचा पाडला फडशा
वैजापूर शहरानजीकच्या शेळकेवस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला गुरुवारी यश आले आहे. पिंजरा लावून ठेवल्यामुळे बिबट्या अलगद त्यात अडकला अन् वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पिंजऱ्यासह वाहनातून घेऊन गेले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालून कुत्र्यांसह हरणांचा फडशा पाडला तर एकावर त्याने हल्लाही केला होता.
पकडेला बिबट्या |
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरानजीकच्या शेळकेवस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याशिवाय बिबट्याने कुत्र्यांसह हरणे व अन्य प्राण्यांचा फडशा पाडायला सुरवात केल्याने नागरिकांमध्ये आणखी भीती पसरली होती.त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बिबट्याला पकडण्याची मागणी केली होती. परंतु वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतरही बिबट्या काही हाती लागत नव्हता.त्यामुळे चार दिवसांपूर्वी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरात पिंजरा लावून ठेवला होता. गुरुवारी सकाळच्या सुमारास बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकलेला नागरिकांना दिसल्यामुळे त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीव्दारे कळवून ही माहिती दिली.
बिबट्याला पकडण्यासाठी लावलेला पिंजरा. |
त्यानुसार कर्मचाऱ्यांनी तेथे येऊन नागरिकांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यासह एका खासगी वाहनात रवाना केले. वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर कवठेकर,वनपाल ए. के. पाटील, वनरक्षक सूरज शेळके आदींनी तेथे जाऊन गोरख गावडे, दीपक शेळके,अमोल शेळके, बाबुराव जाधव,, गणेश निकम, रंगनाथ वरपे, स्वप्निल शेळके, नंदू निकम, दिगंबर शेळके, सचिन गावडे, अरूण साळुंखे, गौरव पवार, संदीप डांगे यांच्या सहकार्याने बिबट्याला वाहनात टाकले. दरम्यान पकडलेल्या बिबट्याला नैसर्गिक आधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तीन महिन्यांपासून होता वावर
वैजापूरनजीकच्या शेळकेवस्ती परिसरात साधारणतः तीन ते चार महिन्यांपासून या बिबट्याचा वावर होता. त्याने अनेक कुत्र्यांसह हरणे व अन्य मुकया जनावरांना भक्ष्य करून फडशा पाडला. याशिवाय एका शेतकऱ्यावर हल्लाही केला होता. तेव्हापासूनच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे बिबट्याला पकडण्यासाठी अनेकवेळा साकडे घालण्यात आले होते. परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही तो हाती लागत नसल्याने त्यांचाही नाईलाज झाला होता.
शेळकेवस्ती परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे आम्ही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन पकडण्याची विनंती केली होती. परंतु बरेच दिवस तो हाती लागला नाही. शेवटी आज अलगद पिंजऱ्यात अडकला. त्याने अनेक प्राण्यांची शिकार करून फडशा पाडला.
- दीपक शेळके, शेतकरी, शेळकेवस्ती
बिबट्याच्या दहशतीमुळे शेळके वस्तीवर चार दिवसांपूर्वी पिंजरा लावून ठेवण्यात आला होता. आज सकाळच्या सुमारास तेथील परिसरातील शेतकऱ्यांना तो पिंजऱ्यात अडकलेला दिसल्यामुळे त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन पिंजऱ्यासह त्याला वाहनात टाकले. बिबट्याचे साधारणतः वय दोन ते अडिच वर्षे असून त्याला कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.
- सूरज शेळके, वनरक्षक, वैजापूर