Thrilling | पोलिस - वाळूमाफियांत धुमश्चक्री; ट्रॅक्टर हिसकावून बाचाबाची, पोलिस पाटील निलंबित

0

 नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 


 

अवैधरित्या पकडलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरवरून माफिया व पोलिसांमध्ये बाचाबाची होऊन धुमश्चक्री झाल्याची घटना २० मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथे घडली. याप्रकरणी नागमठाणच्या पोलिस पाटलासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी ट्रॅक्टर पकडल्यानंतर माफियांनी त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर हिसकावून धूम ठोकली. थोडे पुढे गेल्यानंतर माफियांनी ट्रॅक्टर एका शेतात सोडून पळून गेले. पोलिस - माफियांच्या थरारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 



 

याबाबत अधिक माहिती अशी की, २० मे रोजी सायंकाळच्या सुमारास श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे पोलिसांचे पथक गस्त घालत असताना महाकांळवाडगाव येथील गोदापात्रात ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळविला. पोलिसांनी महाकांळवाडगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात जाऊन शहानिशा केली असता तेथे अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर माफियास पोलिस असल्याचे सांगून त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेत असताना त्याने पोलिसांशी बाचाबाची करून ट्रॅक्टर तालुक्यातील नागमठाण गावाच्या दिशेने पळून घेऊ जाऊ लागला.


 त्याचवेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता थोड्याच अंतरावर माफियाने ट्रॅक्टर शेतात सोडून धूम ठोकली. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला. काही वेळाने अण्णासाहेब  (काळुराम) बाळु गायकवाड, शंकर गायकवाड, महेश गुंजाळ, गणेश जालींदर नरहरे (पोलिस पाटिल नागमठाण) यांच्यासह अन्य चार ते पाच इसम  तेथे आले व त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर बळजबरीने धक्काबुक्की करुन त्यांच्या ताब्यातून हिसकावून घेत ट्रॅक्टरमधील वाळू नागमठाण येथील शेत गट नं. ३ मध्ये खाली करुन घेऊन जात असताना नागमठाणचे पोलिस पाटील गणेश जालिंदर नरहरे यांनी पोलिसांना मदत करणे अपेक्षित असताना त्यांनी मदत न करता ट्रॅक्टरचालक महेश गुंजाळ यास शंकर गायकवाड व अण्णासाहेब गायकवाड व  अन्य चार ते पाच इसमांच्या मदतीने ट्रॅक्टर पळवून लावण्यासाठी मदत केली. 




पोलिसांनी सोनालिका ट्रॅक्टर जप्त केला आहे. गोदापात्रातून वाळू उचलण्याची कोणताही परवाना नसताना  वाळूची उचल करताना आढळून आले. याप्रकरणी  अण्णासाहेब (काळुराम), बाळू गायकवाड, शंकर गायकवाड, महेश गुंजाळ, गणेश जालिंदर नरहरे (पोलिस पाटील नागमठाण ) यांच्यासह अन्य चार ते पाच जणांविरुद्ध श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 एएसपीच्या अंगरक्षकाचा समावेश 


दरम्यान पोलिसांच्या पथकात अहमदनगरचे सहायक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल यांचे अंगरक्षक रोहिदास आंधळे यांच्यासह चार - पाच पोलिसांचा समावेश होता. बेनिवाल यांच्या आदेशानुसारच पोलिसांचे पथक माफियांविरुध्द कारवाई करण्यासाठी गोदापात्रात गेले होते. 


पोलिस पाटील तडकाफडकी निलंबित 


दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी नागठामणचा पोलिस पाटील गणेश जालिंदर नरहरे याला तडकाफडकी निलंबित केले आहे. निलंबन आदेशात उपविभागीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सहायक पोलिस अधीक्षकांचे पथक अवैधरित्या वाळूच्या वाहनावर कारवाईसाठी तालुक्यातील नागमठाण येथे आले असता पोलिसांना मदत करण्याऐवजी आपण माफियाचे ट्रॅक्टर पळवून लावण्यासाठी मदत केली. याबाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. अनधिकृत गौणखनिज वाहतूक होत असल्याने गावातील पोलीस पाटील या नात्याने संबंधितांना मदत न करता शासकीय कामामध्ये मदत करून अनधिकृत गौण खनिज उत्खननाबाबत पूर्व कल्पना असतांना देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून महसुल प्रशासनाची कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. वाळू तस्करांशी संगनमत करून शासनाचा महसूल बुडवत असल्याची खात्री झालेली आहे. तसेच कर्तव्य परायनता व नितांत सचोटी राखली नाही. असे सिध्द होते. त्यामुळे पोलिस पाटील जालिंदर नरहरे याला निलंबित करण्यात आले आहे. 


घरचेच भेदी


तालुक्यातील गोदापात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूउपसा सुरू असून माफियांच्या दावणीला महसूल यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी बांधले गेल्याने माफियांची 'लाॅटरी' लागली आहे. 'घरचेच भेदी' असल्यामुळे गोदावरी उजाड करण्याचा चंग माफियांनी बांधला आहे. तीन दिवसांपूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी भल्या पहाटे येऊन गोदापात्रात वाहने पकडली. त्यानंतरही माफियांचा सपाटा सुरूच आहे. स्थानिक यंत्रणेचा माफियांवर वरदहस्त असल्याने सर्व काही आलबेल सुरू आहे. 

 

 

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top